Sat, Jul 20, 2019 13:08होमपेज › Solapur › वाळूअभावी पाच हजार कोटींची कामे ठप्प

वाळूअभावी पाच हजार कोटींची कामे ठप्प

Published On: Mar 12 2018 10:41PM | Last Updated: Mar 12 2018 10:41PM सोलापूर : प्रतिनिधी

 जिल्ह्यात गेल्या नऊ महिन्यांपासून वाळू लिलाव बंद असल्याने अनेक शासकीय कामांबरोबर निमशासकीय बांधकामेही रखडली आहेत. शहर व जिल्ह्यात जवळपास पाच हजार कोटी रुपयांची बांधकामे रखडली आहेत.

वाळू बंदचा फटका पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घरकुल योजनेलाही बसला आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात बेरोजगारीचे प्रमाण वाढले असून वाळू लिलाव तत्काळ करावेत, अशी मागणी बिल्डर असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे.

सोलापूर जिल्ह्यात अनेक शासकीय विकासकामे सुरू आहेत, तसेच केंद्र शासनाने सुरू केलेल्या 2022 पर्यंत राज्यातील आणि देशातील प्रत्येक बेघर कुटुंबाला हक्काचे घर देण्यासाठी राबविण्यात आलेल्या पंतप्रधान आवास योजनेलाही या वाळू बंदचा फटका बसला आहे. अनेक शासकीय रस्त्यांची आणि इमारतींची कामे चालू आहेत. त्यांनाही वाळू मिळत नाही. यावर काम करणारे हजारो बांधकाम कर्मचारी बेरोजगार झाले आहेत. अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अन्य राज्यांत वाळू व्यवसायालाअधिक महत्त्व दिले जात नाही. मात्र महाराष्ट्रात याचा काळा धंदा सुरु आहे. त्यामुळे वाळू चोरीचे प्रमाण अधिक असून वाळू चोरीने विकण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूलही यामुळे बुडत आहे. त्यामुळे शासनाने या सर्व गोष्टींचा विचार करुन रितसर वाळू लिलावा सुरु करावी, अशी मागणी बिल्डर असोसिएशनच्यावतीने राजेश देशमुख, दत्तात्रय  मुळे, अमर बिराजदार, युवराज चुंबळकर, ए.एस. गांधी, मधुकर कोडम यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे. याबाबतीत एक निवदेन जिल्हाधिकार्‍यांना सादर केले आहे.