Sun, Nov 18, 2018 03:00होमपेज › Solapur › पकडलेला वाळूचा ट्रक पळवून नेण्यासाठी केली पोलिसाने मदत

पकडलेला वाळूचा ट्रक पळवून नेण्यासाठी केली पोलिसाने मदत

Published On: Mar 12 2018 10:41PM | Last Updated: Mar 12 2018 9:17PMसोलापूर : प्रतिनिधी

शहर पोलिस आयुक्तालयातील एका   पोलिस    उपनिरीक्षकाने   पकडलेला वाळूचा ट्रक पळवून नेण्यासाठी चक्क एका पोलिसानेच मदत केल्याची घटना उघडकीस आली असून कर्मचारी अधिकार्‍याला वरचढ ठरल्याची चर्चा आयुक्तालयात होऊ लागली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये आयुक्तालयातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांमध्ये चांगलेच  शीतयुध्द सुरू असून यामुळे आयुक्तालयाची अब्रू चव्हाट्यावर येऊ लागली आहे.

शुक्रवारी रात्री विजापूर नाका पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिस उपनिरीक्षक  मोटे हे रात्रगस्तीसाठी तैनात होते. पहाटे चारच्या सुमारास सैफुल परिसरातून एक ट्रक वाळू घेऊन येताना दिसून आल्याने पोलिस उपनिरीक्षक  मोटे यांनी तो ट्रक अडविला अन् ट्रकचालकाकडे वाळूबाबतची कागदपत्रे मागितली. त्यावेळी  चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने  पोलिस  उपनिरीक्षक  मोटे  यांनी  तो  ट्रक कारवाईसाठी पोलिस ठाण्याकडे नेण्यास सांगितले. त्यावेळी वाळूच्या ट्रकच्या मागून आलेल्या एका बोलेरो गाडीतील काही लोकांनी मोटे यांना  वाळूचा  ट्रक सोडण्यास सांगितले, परंतु मोटे यांनी ऐकले नाही. 

दरम्यान, वाळूचा    ट्रक   पकडल्याची  माहिती मिळताच पहाटेच्या सुमारासदेखील शहरातील वाहतूक    व्यवस्था   सुरळीत   करण्यासाठी  तत्पर असलेल्या   वाहतूक  शाखेतील   पोलिस कर्मचारी विनोद पुजारी   हा  तत्काळ  तिथे  आला.  पुजारी याने  मोटे यांना ट्रक सोडण्यास सांगितले. मोटे हे ऐकत नसल्याचे पाहून पुजारी व बोलेरो गाडीतील लोकांनी पोलिस गाडीच्या पुढे त्यांची गाडी लावली. त्याचा फायदा घेत ट्रकचालकाने ट्रक पळविली व ट्रकमधील  वाळू जुळे सोलापुरातील मीरा पिठाच्या गिरणीजवळ रस्त्यावर ओतून रिकामा ट्रक पळवून नेला. 

या सर्व घटनेची नोंद पोलिस उपनिरीक्षक मोटे यांनी  विजापूर  नाका पोलिस ठाणे आणि सोलापूर शहर नियत्रंण कक्षात केली असून त्याबाबतचा अहवाल वरिष्ठांना पाठविला असल्याचे समजते. 
गेल्या काही दिवसांपासून आयुक्तालयामध्ये चोरट्या वाळूवरून कर्मचारी आणि अधिकार्‍यांमध्ये चांगलेच शीतयुध्द पेटलेले दिसून येत आहे. 

यातूनच वाळूच्या गाड्यांची यादी करणार्‍या एका पोलिसाने विजापूर नाका पोलिस ठाण्याच्या  अधिकार्‍यांविरुध्द जातीवाचक शिवीगाळ केल्याबाबतचा तक्रारी अर्ज केला आहे. त्या अर्जाची चौकशी अद्यापही प्रलंबित असून विविध पोलिस ठाण्यांमध्ये वसुली करणार्‍या कर्मचार्‍यांच्या तक्रारी अर्जांचीही चौकशी सुरू  आहे.  आता तर वाळू चोरीवर कारवाई करण्यासच अधिकार्‍यांना कर्मचारी अडवित असल्याची घटना उघडकीस आलेली आहे. त्यामुळे  सध्या आयुक्तालयामध्ये सुरु असलेल्या या प्रकारांबाबत कर्मचारी व नागरिकांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. शहरातील अवैध धंदे बंद करावेत म्हणून आयुक्तांनी पोलिस ठाण्याच्या अधिकार्‍यांना नोटिसा दिलेल्या आहेत. मग अवैध धंद्यांना खतपाणी घालणार्‍या अशा पोलिस कर्मचार्‍यांवर कारवाई करण्यास आयुक्त का धजावत नाहीत,  असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.