Mon, Jun 17, 2019 05:09होमपेज › Solapur › संभाजी आरमारचा रविवारी  तुळापूरला ‘शंभू शौर्यदिन’

संभाजी आरमारचा रविवारी  तुळापूरला ‘शंभू शौर्यदिन’

Published On: Mar 08 2018 11:01PM | Last Updated: Mar 08 2018 9:05PMसोलापूर : प्रतिनिधी

यंदाच्या वर्षापासून शौर्यपीठ तुळापूर येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाला मुजरा करण्यासाठी ‘शंभू शौर्यदिन’ पाळला जाणार आहे. त्याकरता क्रांतीभूमी सोलापूर ते शौर्यभूमी तुळापूर प्रेरणा रॅली आयोजित केली आहे. 

11 मार्च छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान दिवस. 11 मार्च 1689 रोजी छत्रपती संभाजी महाराजांनी पवित्र हिंदवी स्वराज्याच्या रक्षणार्थ औरंगजेबाच्या आतोनात हालअपेष्टांना तोंड देत, प्रचंड यातना सहन करत आपल्या प्राणाचे बलिदान दिले. छत्रपती संभाजी महाराजांच्या  बलिदानाला जागतिक इतिहासामध्ये तोड नाही. 

ज्या धीरोदात्तपणे 40 दिवस शंभूराजांनी औरंगजेबाच्या नरकप्राय यातनांना तोंड दिले ते केवळ अलौकिकच. त्यावेळी जर छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या जीव रक्षणाचा विचार केला असता तर हा महाराष्ट्र कायम परकियांच्या गुलामगिरीत लोटला गेला असता. महाराष्ट्रावर छत्रपती संभाजी महाराजांचे हे अनंत उपकारच आहेत. आजच्या युवा पिढीला छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा परिचय होणे, त्या बलिदानाचे अलौकिक महत्त्व लक्षात येणे गरजेचे आहे. ज्याठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांनी अखेरचा श्‍वास घेतला, ज्याठिकाणी हे वादळ चिरविश्रांती घेत आहेत ते पवित्र स्थान म्हणजे शौर्यपीठ तुळापूर (ता. हवेली, जि. पुणे). अशी पवित्र ठिकाणे कोणत्याही तीर्थस्थळांपेक्षा कमी नाहीत.

संभाजी आरमार छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान श्‍वास मानून मागील 10 वर्षांपासून अहोरात्र कार्यरत आहे. यंदाच्या वर्षापासून शौर्यपीठ तुळापूर येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाला मुजरा करण्यासाठी ‘शंभू शौर्यदिन’ पाळला जाणार आहे. त्याकरता क्रांतीभूमी सोलापूर ते शौर्यभूमी तुळापूर प्रेरणा रॅली आयोजित केली आहे. तरी हिंदवी स्वराज्य रक्षक असणार्‍या या शिवपुत्राला मानवंदना देण्यासाठी मोठ्या संख्येने शिव-शंभूप्रेमींनी या रॅलीमध्ये सहभागी व्हावयाचे आहे त्यांनी संभाजी आरमार संपर्क कार्यालय, 59, पार्क स्टेडियम गाळे, सिध्देश्‍वर मंदिरशेजारी  संपर्क साधावा.