Thu, Apr 25, 2019 23:26होमपेज › Solapur › आषाढीत एसटी कर्मचार्‍यांचा दे धक्का!

आषाढीत एसटी कर्मचार्‍यांचा दे धक्का!

Published On: Jul 02 2018 1:50AM | Last Updated: Jul 01 2018 11:01PMसोलापूर : प्रतिनिधी

एसटी कर्मचार्‍यांच्या वेतनवाढीचा करार दोन ते तीन वेळा संप करूनही प्रलंबित ठेवण्यात येत आहे. उलट संप करणार्‍या कर्मचार्‍यांवर कारवाईचा बडगा उचलण्यात येत असल्याने आता एसटी कर्मचार्‍यांनीही  महामंडळाला व परिवहन मंत्र्यांना खिंडीत गाठण्याची  योजना आखल्याची चर्चा सुरू असून ऐन पंढरीच्या आषाढी यात्रेतच सरकारला अचानक धक्का देण्याचा विचार संघटनांमध्ये सुरु असल्याची कुजबूज सुरु आहे. कर्मचार्‍यांनी नुकताच पुकारलेला संप अचानकच होता.

ऐन आषाढी यात्रेमध्ये पुन्हा अघोषित संप करून सरकारला आपली ताकद दाखवून देण्याची तयारी एसटी कर्मचार्‍यांनी केली आहे. या अघोषित संपात सर्वच संघटना सहभागी होतील, अशी व्यूव्हरचना आखण्यात येत असल्याचेही सांगितले जात आहे. दरम्यान, ऐन आषाढीवारीत एसटी कर्मचार्‍यांनी संप पुकारला तर महामंडळाचे कोट्यवधी रूपयांचे नुकसान तर होईलच, शिवाय यात्राकाळात एसटी बंद असल्याने प्रचंड गोंधळ उडण्याची शक्यता नाकारता येणार नाही. 

गेल्या वर्षी दिवाळीपासून एसटी कर्मचार्‍यांच्या  वेतनवाढीचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. गेल्यावर्षी दिवाळी मध्ये लालपरीच्या कर्मचार्‍यांनी संप पुकारला होता. त्यानंतर 8 व 9 जून रोजी एसटी कर्मचार्‍यांनी अघोषित संप केला होता. परिवहन मंत्री रावते यांच्या घोषणेनंतर हा संप मागे घेण्यात आला होता. पण कृती समितीच्यावतीने सादर करण्यात आलेला कराराचा प्रस्ताव एसटी प्रशासनाच्या वतीने फेटाळण्यात आला आहे. यामुळे कामगारांमध्ये चीड निर्माण होत असून यासाठी एसटी कर्मचारी पुन्हा संपावर जाण्याच्या पवित्र्यात असल्याची गुप्त चर्चा सुरू आहे. घोषित व अघोषित संप केल्यानंतरही कर्मचार्‍यांच्या हाती काहीच न लागल्यामुळे आता कर्मचार्‍यांमध्ये चीड निर्माण झाली आहे. याचबरोबर काही कर्मचार्‍यांच्या मते आषाढी यात्रा सोडली तर यापुढे एसटी  प्रशासनाला कात्रीत  पकडण्याची संधी मिळणार नाही. यासाठी ऐन आषाढीमध्ये पुन्हा अघोषित संप करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा कर्मचार्‍यांमध्ये रंगली आहे. नुकताच  करारा संबंधीचा प्रस्ताव एमडींनी नाकारला. कामगारांच्या कृती समितीने सादर केलेला प्रस्ताव नाकारल्यामुळे आणि पगारवाढीचे घोंगडे भिजत ठेवले जात असल्यामुळे कर्मचार्‍यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. येत्या काही दिवसात कराराबाबत काय निर्णय घेतला जाणार आहे, यावर पुढील दिशा ठरविली जाऊ शकते.