सोलापूर : प्रतिनिधी
नवी पेठेतील डी-मार्ट फॅशन मार्ट या कपड्याच्या दुकानाचा वरील पत्रा कापून चोरट्याने दुकानातील 3 लाख रुपयांची रोकड चोरून नेली. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. हाजी गुलहमीद मेहबूबसाब नदाफ (रा. उत्तर कसबा, पंजाब तालीमजवळ) यांचे नवी पेेठेत डी-मार्ट फॅशन मार्ट नावाचे कपड्यांच्या सेलचे दुकान आहे. बुधवारी सकाळी त्यांच्या दुकानातील महिला कामगार साऊ आतकरे यांनी दुकानाचे कुलूप उघडून आत आल्यानंतर त्यांना दुकानातील काऊंंटरच्या वरच्या बाजूस असलेला पत्रा कापलेला दिसून आला. त्यामुळे त्यांनी दुकान मालक नदाफ यांना याबाबत महिती दिली.
नदाफ यांनी दुकानात येऊन पाहणी केली असता दुकानाच्या काऊंटरमधील ड्रॉव्हर उचकटून त्यातील रोकड नसल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी फौजदार चावडी पोलिसांना याबाबत माहिती दिली.
फौजदार चावडी पोलिस ठाण्याचे अधिकारी, शहर गुन्हे शाखेचे अधिकारी यांनी दुकानात येऊन पाहणी केली. त्यावेळी नदाफ यांनी गेल्या काही दिवसांतील त्यांच्या वेगवेगळ्या दुकानातून जमा झालेली सुमारे 3 लाख रुपयांची रोकड ड्रॉव्हरमध्ये ठेवली होती व ती चोरीस गेल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी आजूबाजूची पाहणी करून तपास केला. परंतु काही धागेदोरे मिळून आले नाहीत.
याबाबत रात्री उशिरापर्यंत फौजदार चावडी पोलिस ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रीया सुरू होती.