Sun, Jul 21, 2019 08:27होमपेज › Solapur › ग्रामसुरक्षा दल कागदावरच

ग्रामसुरक्षा दल कागदावरच

Published On: Feb 19 2018 1:20AM | Last Updated: Feb 18 2018 8:46PMलक्ष्मी दहिवडी : वार्ताहर

मंगळवेढा तालुका पोलिस स्टेशनकडून अवैध दारू धंदे बंद करण्यासाठी व गावात शांतता सलोखा निर्माण करण्यासाठी  प्रत्येक गावात ग्राम सुरक्षा दल नेमण्यात आले आहे. मात्र हे ग्रामसुरक्षा दलाकडून अंमलबजावणी होत नसल्याने हे ग्रामसुरक्षा दल केवळ कागदोपत्री असल्याचे दिसून येत आहे. मंगळवेढा तालुक्यातील ग्रामीण भागातील अवैध धंदे यांच्या विरोधात प्रशासनाने ग्रामसुरक्षा दल स्थापन करून अवैध धंद्दे बंद करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे होते.

यावेळी अनेक गावात ग्रामसुरक्षा दल स्थापन केले असले तरी फक्त कागदोपत्री असल्याचे दिसून येत आहे. वास्तविक या ग्रामसुरक्षा दलामध्ये ग्रामपंचायतीचे सदस्य असतात. या दलाला विशेष अधिकार देण्यात आले आहेत. मात्र अनेक गावात ग्रामसुरक्षा दल हे कागदोपत्रीच असून गावात अवैध धंद्दे जोरात चालू आहेत. यामुळे गावातील शांतता नष्ट होत आहे.

ग्रामसुरक्षा दलामध्ये कार्यरत असणारे तरुण हे काम करण्यास उत्साही असले तरी पोलिस प्रशासन याबाबत अद्याप शांत आहे. अवैध धंद्दे यांच्यावर एमपीडीए कायद्यांतर्गत गुन्हे दाखल होणार असून पोलिस प्रशासन व उत्पादन शुल्क विभागाने सावधपणे कारवाई केली, तर सोलापूर जिल्ह्यातील अवैध धंद्दे बंद होण्यास खूप मोठी मदत होईल, यात शंका नाही. गावात शांतता व सुव्यवस्था रहावी, यासाठी नागरिकांनी जागृत असणे गरजेचे आहे. अवैध धंद्दे चालत असलेल्या ठिकाणची माहिती पोलिस प्रशासन व ग्रामसुरक्षा दलामध्ये काम करणार्‍या व्यक्तीला तात्काळ दिली पाहिजे.

ग्रामसुरक्षा दलाने  पोलिसांना माहिती दिली तर पोलिस कार्यवाही करतील का नाही याबाबत नागरिकांमधून  शंका व्यक्त होत आहे. मंगळवेढा पोलिसांनी याबाबत ठोस पाऊल उचलून तालुक्यातील प्रत्येक गावात ग्रामसुरक्षा दलामध्ये काम करण्यास इच्छुक असणार्‍या मुलांना ओळखपत्र देऊन त्यांना कामास लावले, तर गावा-गावात सुरु असणारे अवैध धंदे नियंत्रणात राहतील त्याचबरोबर शांतता व सुव्यवस्था निर्माण होण्यास नक्कीच मदत होणार आहे.