Mon, Apr 22, 2019 05:43



होमपेज › Solapur › भूसंपादन मोबदल्याची ३८७ प्रकरणे निकाली काढू : जिल्हाधिकारी

भूसंपादन मोबदल्याची ३८७ प्रकरणे निकाली काढू : जिल्हाधिकारी

Published On: Feb 13 2018 1:58AM | Last Updated: Feb 12 2018 9:51PM



 सोलापूर : प्रतिनिधी 

शेती भूसंपादनाची अनेक प्रकरणे प्रशासनाकडे प्रलंबित असून त्यासाठी शेतकरी गेल्या 10 ते 15 वर्षांपासून प्रतीक्षा करीत आहेत. तर नुकतीच मंत्रालयात जमिनीच्या मोबदल्यासाठी एका शेतकर्‍याने आत्महत्या केल्याचे प्रकरण ताजे असताना तो प्रकार जिल्ह्यात घडू नये, यासाठी जिल्हा प्रशासन आता जागे झाले असून तलावासाठी भूसंपादन केलेल्या जमिनींची 387 प्रकरणे तत्काळ निकाली काढण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली.

सोलापूर जिल्ह्यात रोजगार हमी योजनेंतर्गत पाझर तलाव घेण्यात आले असून यासाठी जवळपास 387 शेतकर्‍यांच्या जमिनी गेल्या असून त्यांना अद्याप जमिनीचा मोबदला मिळालेला नाही. ही प्रकरणे गेल्या 10 ते 15 वर्षांपासून प्रलंबित आहेत. त्यामुळे शेतकरी चिंतातूर असून जमिनीचा मोबदला मिळावा, यासाठी ते सातत्याने जिल्हा प्रशासनाकडे हेलपाटे मारत आहेत. यापूर्वीही भूसंपादनासाठी विशेष बैठक घेण्यात आली होती, त्यामध्ये 22 प्रकरणांवर चर्चा केल्यानंतर 6 प्रकरणासाठी मोबदला मिळाला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना तात्काळ जमिनीचा मोबदला मिळावा, यासाठी विभागीय आयुक्तांशी बोलणे झाले असून त्यावर शासनाच्या कायद्याप्रमाणे मोबदला द्यायचा की खासगी वाटाघाटी करुन मोबदला ठरवायचा यावर सविस्तर बोलणे झाले आहे. त्यामुळे तात्काळ ही प्रकरणे निकाली काढण्यात येतील, असा विश्‍वास जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी व्यक्त केला आहे.