होमपेज › Solapur › नववर्ष स्वागतासाठी बाजारपेठ सज्ज

नववर्ष स्वागतासाठी बाजारपेठ सज्ज

Published On: Mar 14 2018 10:08PM | Last Updated: Mar 14 2018 9:48PMसोलापूर : प्रतिनिधी

 प्रत्येक हिंदूच्या दृष्टीने महत्त्वाचा असा सण म्हणजे गुढी पाडवा होय.साडेतीन मुहूर्तांपैकी एक सण मानला  जातो. गुढी पाडव्या दिवशी सकाळी अभ्यंगस्नान करावे व सूर्योदयापूर्वी गुढी उभी करावी, असे मानले जाते.गुढी उभारण्यापूर्वी  काठीला प्रथम गरम पाण्याने अंघोळ घालावी. तिला हळद चंदनाने व  सुवासिक द्रव्यांनी प्रसादित करावे. सजलेली गुढी सूर्योदयापासून सूर्यास्तापूर्वीपर्यंत घरावर डौलाने उभी करावी. हा ब्रह्मध्वज आहे. विजयाचे प्रतिक म्हणून गुढी उभी केली जाते.

सोलापुरात हिंदू बांधव हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. शहरात  विविध  ठिकाणी   गुढी पाडव्याला लागणार्‍या साहित्यांची दुकाने  व  स्टॉल   थाटले आहेत. मधला मारुती, टिळक चौक, कुंभार वेस, कोंतम चौक, नवी पेठ, बाळीवेस, टिळक चौक, सात रस्ता, विजापूर रोड आदी परिसरातील दुकानात गुढी पाडव्याला लागणारे साखरेचे व खोबर्‍याचे हार विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. साखरेचा हार प्रतिनग 10 ते 250 रुपये, तर खोबर्‍याचे हार 250 रुपये प्रतिकिलो असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. 

चैत्र शुक्‍ल पक्षाच्या प्रथम दिवशी पाडव्याला भगवान राम सपत्नीक आपल्या सर्व दलासह अयोध्येला 14 वर्षांचा वनवास संपवून परत आले होते. रावणावरच्या अतुलनिय विजयाचे कौतुक म्हणून आनंदाच्या प्रित्यर्थ अयोध्यावासीयांनी आपल्या घरी गुढ्या उभ्या केल्या होत्या. त्या आनंदाचे  प्रतीक म्हणून गुढी उभी केली जाते.राजा शालिवहनचा सकस वरील विजयाचे प्रतीक आहे. राज्यातील लोकांनी पैठणमध्ये आगमन झाल्यानंतर गुढी उभारल्या होत्या. असे मानले जाते की, गुढी वाईट शक्तींना घरापासून दूर ठेवते. समृध्दी आणि भाग्य घरी आमंत्रित करते.

महाराष्ट्रीयन लोकांसाठी हा सण, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अधिपत्याखाली मराठा सैनिकांना मिळालेल्या विजयाचे प्रतिक आहे. गुढी पाडव्याला अनेक हिंदू बांधव नवीन धंदा किंवा कुठल्याही नवीन कामाला सुरुवात करतात. त्याचप्रमाणे अनेक सोलापूरकरांनी नवीन वाहनांची बुकींग केलेली आहे. शहरातील दुचाकी व चारचाकी वाहनांच्या शोरुमवाल्यांनी नवीन खास आकर्षक भेटवस्तूसह व किंमतीमध्ये सूट देत वाहने विक्रीस उपलब्ध केली आहेत. गेल्यावर्षीपेक्षा अधिक उलाढाल यावर्षी होण्याची शक्यता शोरुमवाल्यांनी व्यक्त केली आहे. सुमारे 5 ते 10 कोटी रुपयांपर्यंत दुचाकी व चारचाकी वाहनांची विक्री होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

हिंदू बांधव गुढी पाडव्याला घरांमध्ये काहीतरी नवीन वस्तू देखील आणतात. त्यासाठी इलेक्ट्रॉनिक वस्तू मार्केटमध्ये सुध्दा मोठी लगबग पहावयास मिळत आहे. इलेक्ट्रॉनिक दुकानधारकांनी फ्रीज, वॉशिंग मशीन, टीव्ही, कुलर आदी वस्तूंवर खास आकर्षक सूट देत ग्राहकांना आमंत्रित करत आहेत.