Fri, Apr 19, 2019 11:57होमपेज › Solapur › सरकारचे ध्येयधोरण सहकाराला मारक

सरकारचे ध्येयधोरण सहकाराला मारक

Published On: Dec 15 2017 2:47AM | Last Updated: Dec 14 2017 9:02PM

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

कापसाचे वाढलेले दर, सहकारमंत्री सुभाष देशमुख सूत गिरण्यांना मदत करण्याबाबत सक्षम नसल्यामुळे सूत गिरण्यांना घरघर लागली आहे. याबरोबरच सरकारचे ध्येयधोरण सहकाराला मारक असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य स्पिनिंग मिल फेडरेशनचे संचालक आणि वळसंग येथील स्वामी समर्थ सूत गिरणीचे चेअरमन राजशेखर शिवदारे यांनी  पत्रकार परिषदेत केला.

शिवदारे म्हणाले, सहकार क्षेत्रात अनंत अडचणी असूनही केवळ  सातशे कामगारांच्या हितासाठी आपण आपली स्वामी समर्थ सूत गिरणी चालू ठेवली आहे. जागतिक मंदी, कापसाचे वाढलेले दर, सुताच्या भावात न झालेली वाढ, सुतास नसलेला उठाव तसेच इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात 3 रुपयांनी जास्त असलेला वीजदर या प्रमुख कारणांमुळे राज्यातील गिरण्यांना प्रति किलो 20 ते 25 रुपये नुकसान होत असल्यामुळे   25 हजार चात्याच्या एका सूत गिरणीस प्रतिमहा अंदाजे 50 ते 60 लाखांचे नुकसान होत आहे. या दररोजच्या तोट्यामुळे राज्यातील सहकारी सूत गिरण्यांचे स्वभांडवल कमी होऊन मागील दोन वर्षांपासून गिरण्या अडचणीतून मार्गक्रमण  करत असल्याचेही शिवदारे यांनी सांगितले. 

  राज्य सरकारला विविध स्वरूपात वार्षिक अडीचशे  ते तीनशे कोटींचा महसूल मिळतो. या सूत गिरण्या बंद झाल्या तर  कामगार बेकार होऊन त्यांचे व त्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ येणार आहे. या समस्येबाबत सकारात्मक भूमिका घेऊन आर्थिक मदत करण्याबाबत शासनाकडे सहकारी सूत गिरण्यांच्या शिखर संस्थेमार्फत निवेदन देऊन पाठपुरावा करण्यात येत होता. परंतु शासनाने प्रमुख तीन  ते चार मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. सरकार सहकार मोडित काढण्याचा प्रत्यत्न करीत आहे.  महाराष्ट्रात चालू  असलेल्या 61 पैकी एकही गिरणी नफ्यात नाही आणि घसारा सोडल्यास फक्त 4 गिरण्या कॅशगेनमध्ये असल्याचे शिवदारे यांनी सांगितले.  सरकारने कमी व्याजदरात भागभांडवल उपलब्ध करून द्यावे आणि वीजदर कमी करावा. नाही तर सूत गिरण्या बंद करण्याची परवानगी सरकारने द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसे न झाल्यास राज्यातील सुमारे 30 हजार कामगार बेकार होतील, अशी भीतीही व्यक्त केली आहे. महाराष्ट्रात 61 सहकारी सूत गिरण्या उत्पादनाखाली असून या सूत गिरण्यांमध्ये राज्य शासनाची सुमारे 2 हजार कोटींची गुंतवणूक आहे. गिरण्यांची स्थापित चात्यांची संख्या 14  लाख इतकी असून वार्षिक उत्पादन 1500 लाख इतके आहे. वार्षिक उलाढाल 2500 कोटी आहे. राज्यात 133 गिरण्यांची नोंद असून त्यापैकी 61 गिरण्या चालू अवस्थेत आहेत. 16 गिरण्या बंद आहेत, तर  15 गिरण्या अवसायनात आहेत. 4 गिरण्या कन्व्हर्टेड आणि 22 गिरण्यांची उभारणी सुरू आहे.