Sun, Sep 23, 2018 06:03होमपेज › Solapur › डाळिंबाला ‘अच्छे दिन’

डाळिंबाला ‘अच्छे दिन’

Published On: Mar 12 2018 10:41PM | Last Updated: Mar 12 2018 9:20PMपंढरपूर : प्रतिनिधी

दीड वर्षाच्या प्रतीक्षेनंतर डाळिंबाला चांगला दर मिळू लागला आहे. बाजारात डाळिंबाची आवक कमी झाली असल्याने चांगल्या दर्जाच्या भगवा डाळिंबाला 100 ते 120 रुपये प्रति किलो दर मिळत आहे. गणेश डाळिंबालाही 50 ते 60 रुपये प्रति किलो दर मिळत असल्याने डाळिंब उत्पादक शेतकर्‍यांतून समाधान व्यक्त केले जात आहे.

मागील दीड ते दोन वर्षांपासून डाळिंबाला म्हणावा तसे दर मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले होते. महागडी खते, औषध फवारणी, मजुरी याचा विचार करता शेतकर्‍यांना म्हणावा तसा आर्थिक फायदा मिळत नव्हता. चांगल्या दर्जेदार डाळिंबाचीही 30 ते 40 रुपये किलो दराने विक्री होत होती. त्यामुळे डाळिंब जनावरांना चारा म्हणून वापरण्यावर शेतकर्‍यांनी भर दिला होता. यातच तेल्यासारख्या रोगाने ग्रस्त झालेल्या बागा शेतकर्‍यांनी उपटून टाकण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे सध्या बाजारात डाळिंबाची आवक कमी झाली आहे. त्याचबरोबर आंबा अद्याप बाजारात दाखल झाला नाही. त्यामुळे डाळिंबाला चांगले दिवस आले आहेत.

सध्या उन्हाळी बहार धरण्यासाठी शेतकर्‍यांनी अधिकतर बागांची छाटणी केली आहे. त्यामुळे बाजारात डाळिंबाची आवक कमी झाली आहे. बाजारात गणेश डाळिंबालाही 40 ते 60 रुपये प्रति किलो दर मिळत आहे.  भगवा डाळिंबाला 60 ते 120 रुपये प्रति किलो दर मिळत आहे. सरासरी 80 रुपये भगवा डाळिंबाला दर मिळत आहे. त्यामुळे दीड वर्षानंतर प्रथमच डाळिंबाला चांगला दर मिळत असल्याने डाळिंब उत्पादक शेतकर्‍यांतून आनंद व्यक्त केला जात आहे.

जागेवरही व्यापार्‍यांकडून डाळिंब खरेदी केले जात आहे. चांगला दर मिळत असल्याने शेतकरी सरसकट जागेवर डाळिंब व्यापार्‍याला विक्री करीत आहेत. गणेश डाळिंब 60 रुपये, तर भगवा डाळिंब 90 ते 110 रुपये किलो दराने खरेदी केले जात आहे. डाळिंबाला चांगला दर मिळत असल्याने चोरट्यांपासून डाळिंबाचे संरक्षण शेतकर्‍यांना करावे लागत आहे.