Fri, Jul 19, 2019 00:55होमपेज › Solapur › मंत्रालयातील थप्पड की गूंज सोलापुरात!

मंत्रालयातील थप्पड की गूंज सोलापुरात!

Published On: Mar 11 2018 11:24PM | Last Updated: Mar 11 2018 11:24PMसोलापूर : श्रीकांत साबळे

सोलापूरच्या राजकारणात एकाच पक्षात राहूनही एकमेकांना वैर्‍याप्रमाणे मानणार्‍या दोन देशमुखांमधील वादाच्या परमोच्च टोकाचे दर्शन अलीकडेच मंत्रालयातील घडलेल्या एका घटनेतून सोलापूरकरांना घडले आहे. प्रतिस्पर्धी देशमुख समर्थकाची जिरविण्याच्या नादात या समर्थकाने समोरच्याची अशी काही जिरवली की या मंत्रालयातून निघालेला थप्पड की गूंज का आवाज गत काही दिवसांपासून सोलापुराच्या राजकारणात चांगलाच घुमू लागला आहे. त्यामुळे हा वाद आणखी कोणते रुप धारण करेल, हे सांगणे कठीण होऊन बसले आहे. 

सोलापूरच्या राजकारणात गत तीन वर्षांपासून विशेषत: सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना मंत्रीपदाची लॉटरी लागल्यापासून पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख यांच्यातील पक्षांतर्गत तसेच नेतृत्वावरुन निर्माण झालेला वाद चांगलाच रंगतोय. शहरी भागाचे कोणी आणि ग्रामीण भागाचे कोणी नेतृत्व करायचे, यावरुन तर हा वाद पराकोटीलाच पोहोचला आहे. त्यातच की काय सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत येथील जनतेने भरभरुन म्हणजेच 49 नगरसेवक निवडून देत महापालिकेवर भाजपच्या हाती एकहाती सत्ता दिली खरी, परंतु याही ठिकाणी माझ्या गटाचे एवढे, तुझ्या गटाचे एवढे, त्यामुळे मलाच सभापती, महापौर, स्थायी समिती सभापतीपद, गटनेतेपद हवे म्हणून हे दोन्ही देशमुख एकमेकांवर कुरघोड्या करण्यात दंग झालेले आहेत. अलीकडेच झालेल्या स्थायी समिती सभापतीच्या निवडणुकीत जे काही रामायण झाले ते आमसोलापूकरांनी उघड्या डोळ्यांनी पाहिले होते. हे रामायण कमी होते की याचा दुसरा अंक म्हणजे महाभारत मुंबईतील मंत्रालयात घडले. कधीकाळी सोलापूरच्या राजकारणात वाघाच्या डरकाळ्या फोडत राजाप्रमाणे गल्लोगल्ली खर्‍याखुर्‍या वाघाला घेऊन फिरणार्‍या एका देशमुख समर्थकाला दुसर्‍या समर्थकाने एका मॅटरवरुन नेहमीच्या स्टाईलमध्ये अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. वास्तविक पाहता या राजाचा रुबाब असणार्‍या नेत्याला कुठला देशमुख आणि कुठला कोण याच्याशी काहीही देणेघेणे नव्हते, परंतु कॉमन रिस्पेकटचा भाग म्हणून या नेत्याने संबंधीत देशमुख मंत्रीमहोदय यांना असे करु नका, तसे करु नका म्हणून गयावयाही केली, परंतु आजूबाजूच्या पिल्लवळीचे ऐकून मंत्रीमहोदय काही केेले ऐकायला तयार होत नसल्याचे लक्षात येताच राजाच्या रुबाबात वावरणार्‍या या नेत्याने अशी काही डरकाळी फोडली की त्याचा आवाज थेट सोलापुरात येऊन घुमला. तू-तू-मै-मैच्या या झटापटीत एका चेल्ल्याची तर पळताभुई थोडी झाली होती, अखेर नरमाईची भूमिका आणि मुख्यमंत्र्यांशी असलेली सलगी यामुळे या नेत्याने आपला राग आवरता घेत तिथून निघून जाणे पसंत केले खरे, परंतु जाता जाता या नेत्याने आपल्या तक्रारीचा पाढा मुख्यमंत्र्यांकडे वाचत अशा कुरघोड्यांमुळे कशी सोलापूरची वाट लागली आहे, हेही त्यांच्या निदर्शनास आणून देत मुंबईचा निरोप घेत सोलापूरचा रस्ता धरला. मंत्रालयात घडलेल्या या प्रकरणाची गत काही दिवसांपासून सोलापूरच्या राजकारणात चांगलीच चर्चा रंगली असून, यातून तरी हे देशमुख महाशय धडा घेतील का, असा सवाल उपस्थित केला जात असून, सामोपचाराने न घेतल्यास याचा पुढचा संघर्ष कसा असेल हे सोलापूर आणि बार्शी बाजार समितीच्या निवडणुकीतून दिसून येईल, असे राजकारणातील जाणकारांचे म्हणणे आहे.