Fri, Jul 19, 2019 01:45होमपेज › Solapur › मंगळवेढा पोलिसांना निनावी लेटरचा छडा लागेना  

मंगळवेढा पोलिसांना निनावी लेटरचा छडा लागेना  

Published On: Jul 06 2018 8:12PM | Last Updated: Jul 06 2018 8:12PMमंगळवेढा : तालुका प्रतिनिधी 

सेवानिवृत्त पोलिस कर्मचारी सरकारी कामात हस्तक्षेप करून प्रशासनाची गोपनीय माहिती अवैध धंदेवाले, वाळू तस्करांना देत असल्याचे एक निनावी पत्र पोलिस महासंचलकाना प्राप्त झाले असून, हे पत्र कुणी पाठवले, तो सेवा निवृत्त पोलिस कर्मचारी कोण याचा शोध घेण्यासाठी पोलिस मागील तीन महिन्यांपासून  प्रयत्न करीत आहेत मात्र, पत्र पाठवणारा सापडत नसल्याने मंगळवेढा पोलिस हैराण झाले आहेत.

हे निनावी पत्र १४ मार्च रोजी विशेष पोलिस महासंचालक मुंबई यांना पाठविण्यात  आले आहे. या पत्रात सेवानिवृत्त पोलिस कर्मचारी हा 2014 मध्ये सेवानिवृत्त झाल्याचे म्हटले आहे. तो पोलिस कर्मचारी मंगळवेढा पोलिस ठाण्यात दिवसभर येवून पोलिस कर्मचारी व जनतेला नाहक त्रास देवून पैसे उकळत असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. अवैध धंदेवाले त्यांना दमदाटी करून स्वतः सेवेत कार्यरत असल्याचे भासवून पैसे मिळवत असल्याचाही आरोप त्या पत्रात करण्यात आला आहे. सेवानिवृत्त झाल्याने कोणतेही अधिकार नसताना स्टँपवर खोटे करारपत्रे तयार करून आरोपीचे खोटे जबाब व खोटी तपास टिपनी करून घेवून संबंधित राजकारणी नेते, कार्यकर्ते, नातेवाईक यांच्याकडून गैरमार्गाने पैसे कमवत असल्याचे म्हटले आहे.

मंगळवेढा पोलिस स्टेशनमधील महत्वाची व गोपनीय माहिती गुन्हा दाखल होण्यापूर्वी आरोपींना व राजकीय नेत्यांना माहिती देत आहे. वाळूमाफियांना अवैध दारू, मटका घेणारे या लोकांना फोन करून छापे टाकण्यापूर्वीची माहिती देवून त्यांना जागृत करीत आहे. तसेच अवैध व्यवसायांकडून मंथली गोळा करीत असल्याचे या निनावी पत्रात नमूद  करण्यात आले आहे. हे पत्र वरिष्ठ कार्यालयाकडून  मंगळवेढा  पोलिसांकडे चौकशीसाठी आले आहे. 

सध्या मंगळवेढा पोलिस या पत्राची कसून चौकशी करीत आहेत. मात्र अद्यापही तो निनावी तक्रारदार पोलिसांना सापडत नसल्यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. पोलिस मात्र त्या पत्राने हैराण झाले आहेत. या चौकशीमध्ये नुकतेच पोलिसांनी दोघांचे जबाब नोंदविले आहेत. हे पत्र पोलिस प्रशासनामधील एका उपद्व्यापी कर्मचार्‍यानेच पाठविल्याचा दबक्या आवाजात सूर निघत आहे. मंगळवेढा पोलिस ठाण्यातील  एकमेकांचे पाय ओढण्यातून हा प्रकार घडल्याची चचा सुरू आहे.  पोलिस अधिकारी ज्यांनी पत्र पाठविले तिथेपर्यंत पोहोचणार का? हा संशोधनाचा विषय असल्याची चर्चा आहे. दरम्यान, अज्ञाताने पत्र लिहिताना कुठेही हस्ताक्षराचा वापर न करता संगणकावर ते पत्र तयार करून पॉकेटवरही नाव संगणकावर तयार करून चिटकल्यामुळे पोलिस पेचात पडले आहेत.