Wed, May 22, 2019 17:09होमपेज › Solapur › सोलापूर : संतोष धोत्रेसह सहा जण ९ तालुक्यातून हद्दपार

सोलापूर : संतोष धोत्रेसह सहा जण ९ तालुक्यातून हद्दपार

Published On: Jun 20 2018 6:54PM | Last Updated: Jun 20 2018 6:54PMकरकंब : प्रतिनिधी

करकंब पोलिस स्टेशन अंतर्गत असलेल्या करकंब, भोसे, बार्डी या तीन गावातील टोळी प्रमुखासह सहा जणांची टोळी एक वर्षासाठी नऊ तालुक्यातून हद्दपार करण्यात आले आहे. या प्रकरणी जिल्हा पोलिस प्रमुख एस विरेश प्रभु यांनी आदेश दिले असल्याची माहिती सहाय्‍यक पोलिस निरीक्षक उमेश धुमाळ यांनी दिली.

करकंब पोलिस स्टेशन अंतर्गत असलेल्या करकंब, भोसे, बार्डी येथील सहा जणांच्या टोळीने बेकायदेशीर कृत्य केल्या प्रकरणी करकंब पोलिसांनी उपविभागीय पोलिस अधिकारी निखिल पिंगळे यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाला पिंगळे यांनी मान्यता देऊन पुढील कार्यवाहीसाठी जिल्हा पोलिस प्रमुख एस विरेश प्रभु यांच्याकडे सादर केला. यावर जिल्हा पोलिस प्रमुख यांनी चौकशी अधिकारी म्हणून उपविभागीय पोलिस अधिकारी, करमाळा यांची नेमणूक केली होती.

यामध्ये करमाळा उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या चौकशीअंती टोळीवर दाखल असलेले गुन्हे, त्यांनी दिलेले म्हणणे, गोपनीय साक्षीदारांचे जबाब व टोळीने केलेले बेकायदेशीर कृत्य याचा जिल्हा पोलिस प्रमुख यांच्याकडे अहवाल सादर करण्यात आला. या अहवालाचा व्यापक विचार करुन जिल्हा पोलिस प्रमुख प्रभू यांनी महाराष्ट्र पोलिस अधिनियम सन १९५१ चे कलम ५५ मधील तरतुदिनुसार संतोष धोत्रे (टोळी प्रमुख), दीपक ढोबळे, सुभाष भरते, बाबा गायकवाड (रा. सर्वजण करकंब ता पंढरपूर), रमेश कोरके रा भोसे ता पंढरपूर, वैभव भोसले रा बार्डी ता पंढरपूर या टोळीतील सदस्यांना सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, करमाळा, मंगळवेढा, माढा, माळशिरस, सांगोला आणि मोहोळ तर पुणे जिल्ह्यातील इंदापूर व बारामती अशा एकूण नऊ तालुक्यातून सहजणांच्या टोळीला तड़ीपार करण्यात आले आहे, असे सपोनि उमेश धुमाळ यांनी सांगितले