Mon, May 27, 2019 01:17होमपेज › Solapur › सोलापूर : वाळू तस्करांना मदत करणारा पोलिस शिपाई निलंबित

सोलापूर : वाळू तस्करांना मदत करणारा पोलिस शिपाई निलंबित

Published On: Mar 24 2018 7:06PM | Last Updated: Mar 24 2018 7:05PMसोलापूर : प्रतिनिधी

पोलिस उपनिरीक्षकाशी हुज्जत घालून, कारवाईसाठी पकडलेला वाळूचा ट्रक पळवून लावून पोलिस खात्याची  प्रतिमा मलिन करणार्‍या शहर  वाहतूक शाखेच्या  पोलिस शिपायास पोलिस आयुक्त महादेव तांबडे यांनी अखेर निलंबित केले.  त्यामुळे  आयुक्तालयात वसुली करणार्‍या कर्मचार्‍यांचे धाबे दणाणले आहे. 

१० मार्चला विजापूर नाका पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक मोटे हे रात्रगस्त करीत असताना पहाटे ४ च्या सुमारास जुळे सोलापूरातील कुसुमराज मंगल कार्यालयाजवळ बेकायदेशिररीत्या वाळू वाहतूक करीत असलेला ट्रक मोटे यांनी थांबविला. त्यावेळी ट्रक व ट्रकचालक यांच्याविरुध्द कायदेशीर कारवाई करीत असताना वाहतूक शाखेचा पोलिस शिपाई विनोदकुमार अर्जुन पुजारी हा घटनास्थळी आला व त्याने पोलिस उपनिरीक्षक मोटे यांनाच त्यांची ओळख विचारली. तसेच आपण वाहतूक शाखेत नोकरीस असून वाळूच्या  गाडीचा वसुलदार आहे, हा ट्रक सोडून  प्रकरण येथेच मिटवा असे  म्हणून   पुजारी  याने त्याची मोटारसायकल जाणीवपूर्वक मोटे यांच्या सरकारी वाहनासमोर आडवी  लावली. त्यामुळे वाळू वाहतूक करणार्‍या ट्रकचालकाने वाळूचा ट्रक पळवून नेला. त्यामुळे वाळूचा ट्रक पळवून लावण्यास मदत केल्याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक मोटे  यांनी पुजारीविरुध्द विजापूर नाका पोलिस ठाण्यात  व नियत्रंण कक्षाला नोंद  केली. तसेच त्याबाबतचा अहवाल वरिष्ठ अधिकार्‍यांना सादर केला होता.

या प्रकरणाची चौकशी पोलिस आयुक्त महादेव तांबडे यांनी सहायक पोलिस आयुक्त सकळे यांच्याकडे दिली होती. सकळे यांच्याकडील चौकशीची फाईल शनिवारी आयुक्त तांबडे यांनी मागवून घेऊन पोलिस शिपाई विनोद पुजारी यास निलंबित करण्याचे आदेश दिले.

पोलिस शिपाई विनोद पुजारी हा एक जबाबदार पोलिस अंमलदार म्हणून काम करीत असताना त्या घटनेशी त्याचा काहीही  संबंध नसताना पहाटे साडेचारच्या सुमारास गैरहेतुने  घटनास्थळी  जाऊन कायदेशीर कारवाईमध्ये पोलिस उपनिरीक्षकांना मज्जाव करुन पोलिस खात्याची प्रतिमा मलिन होईल अससे वर्तन केले असल्याचे आयुक्त तांबडे यांनी आदेशात म्हंटले आहे. निलंबिन कालावधीत पुजारी यांची नेमणूक पोलिस मुख्यालय तेथे असणार असून दररोज दोन वेळेस हजेरी देणे बंधनकारक करण्यात आले आहे.