Thu, Sep 20, 2018 18:01



होमपेज › Solapur › सोलापूर : पोलिसाचाच पोलिसावर खुनी हल्ला

सोलापूर : पोलिसाचाच पोलिसावर खुनी हल्ला

Published On: Dec 27 2017 6:26PM | Last Updated: Dec 27 2017 6:26PM

बुकमार्क करा




सोलापूर : प्रतिनिधी

पूर्ववैमनस्यातून पोलिसानेच पोलिसावर हल्‍ला केल्‍याचा प्रकार घडला घडला आहे. यात पोलिस कर्मचार्‍यावर धारदार शस्त्राने खुनी हल्ला करुन, घरातील साहित्य पेटवून देऊन नुकसान केल्याप्रकरणी पोलिस कर्मचार्‍याविरुध्दच  सदर  बझार पोलिस  ठाण्यात  गुन्हा  दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास सात रस्ता परिसरातील शामानगर पोलिस वसाहतीमध्ये घडली.

पोलिस नाईक सायबण्णा नागनाथ कमळे (ब. नं. 1719, वय 34, रा. शामानगर पोलिसलाईन, सोलापूर) यांच्या फिर्यादीवरुन पोलिस शिपाई   पवनकुमार   राजेंद्र   राठोड (ब. नं. 1789,  नेमणूक पोलिस मुख्यालय, सोलापूर शहर) याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस शिपाई राठोड विरुध्द यापूर्वीही पुण्यातील पिंपरी पोलिस ठाण्यात तसेच सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास  शामानगर पोलिसलाईनमध्ये पोलिस शिपाई पवन राठोड याने पूर्ववैमनस्यातून पोलिस नाईक कमळे याच्या घरासमोर जाऊन हातात असलेल्या धारदार कोयत्याने तुला मी खलास करतो असे म्हणून कमळे यांच्या अंगावर धावून जाऊन त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. तसेच राठोड याने कमळे यांच्या घरात घुसून घरातील गादी, बेडशीट यास आग लावून फ्रिज, टीव्ही तोडून घरातील साहित्यांचे 15 हजार रुपयांचे नुकसान केले. यावेळी याठिकाणी आलेल्या नियत्रंण कक्ष व सदर बझार पोलिस ठाण्याच्या कर्मचार्‍यांनी राठोड यास पकडण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांच्या हाताला हिसका मारुन राठोडने हत्यारासह पळ काढला. याबाबत सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक पाटील या घटनेचा  तपास करीत आहेत.