होमपेज › Solapur › तलवार, कोयत्याच्या जोरावर पेट्रोल पंप लुटणार्‍यास अटक

तलवार, कोयत्याच्या जोरावर पेट्रोल पंप लुटणार्‍यास अटक

Published On: Apr 17 2018 10:33PM | Last Updated: Apr 17 2018 10:14PMसोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर-पुणे महामार्गावरील लांबोटी  येथील  जोशाबा  पेट्रोल  पंपावर तलवार व कोयत्याने धाक दाखवून पेट्रोल पंपावरील 4 लाख 59 हजार रुपयांची रोकड व मोबाईल हँडसेट जबरदस्तीने चोरुन नेणार्‍या टोळीतील मुख्य सूत्रधारास सोलापूर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली.

पोपट मनोहर मुळे (वय 32, रा. खंडाळी, ता. मोहोळ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत सोमनाथ विश्‍वनाथ अवशेट्टी (वय 30, रा. हत्तुर, ता. दक्षिण सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

11 मार्च रोजी मध्यरात्रीच्या सुमारास लांबोटी शिवारातील जोशाबा पेट्रोल पंपावर 4 अनोळखी लोकांनी चारचाकी वाहनातून येऊन पेट्रोंल पंपावरील गणेश शिवपुजे व मॅनेजर सोहेल खान यांना तलवार व कोयत्याचा धाक दाखवून मारहाण करुन 4 लाख 59 हजार रुपये रोख, दोन मोबाईल जबरदस्तीने चोरून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत सोमनाथ अवशेट्टी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्याचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळालेल्या माहितीवरुन पोलिसांनी पोपट मुळे यास चौकशीसाठी ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी त्याला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने हा गुन्हा त्याच्या जावेद वालीकर (रा. हांजगी, ता. इंडी, जि. विजापूर, कर्नाटक) व इतरांच्या मदतीने केल्याची कबुली दिली. 

पोपट   मुळे  याच्यावर राज्य उत्पादन  शुल्क विभागाने दारुचा खटला केला होता. त्यावेळी तो सोलापूर कारागृहतात असताना त्याची ओळख  इतर गुन्ह्यांत अटक असलेल्या जावेद वालीकर याच्याशी ओळख झाली. त्यावेळी जावेद वालीकर याने मुळे यास जास्त कॅश जमा होणारी ठिकाणे कोठे कोठे आहेत याबाबत विचारणा करुन ती ठिकाणे दाखविल्यास त्याचा हिस्सा देऊ, असे सांगितले होते. त्यामुळे कारागृहातून बाहेर आल्यानंतर पोपट मुळे याने जावेद वालीकर व इतरांना जोशाबा पेट्रोल पंप दाखवून तेथे जास्त कॅश जमा होत असल्याचे सांगितले होते. पोपट मुळे याने सन 2014 मध्ये जोशाबा पेट्रोल पंप चालविण्यास घेतला होता. त्यामुळे त्यास पंपावरील रकमेची माहिती होती. त्यानुसार वालीकर व मुळे या दोघांनी पंपाची रेकी करुन 11 मार्च रोजी रक्कम चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यानुसार पोलिसांनी पोपट मुळे यास अटक करुन मोहोळ पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.  जावेदसाब काझीसाब वालीकर हा विजापूर येथील एका गुन्ह्यात अटक असून त्यास विजापूर न्यायलयातून वर्ग करुन घेण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ही  कामगिरी  पोलिस  अधीक्षक एस. वीरेश   प्रभू, अप्पर  पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलिस निरीक्षक विजय कुंभार यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक बाबुराव म्हेत्रे, हेमंत भंगाळे, हवालदार नारायण गोलेकर, संदीप काशीद, मारुती रणदिवे, सचिन वाकडे, सागर शिंदे, राहुल सुरवसे, रवी हटकिले, मनिष पवार यांनी केली.