Sat, Apr 20, 2019 18:07होमपेज › Solapur › ‘पतंजली’चे व्हिजन सोलापूरच्या टेक्स्टाईलला तारण्याची आशा

‘पतंजली’चे व्हिजन सोलापूरच्या टेक्स्टाईलला तारण्याची आशा

Published On: Mar 19 2018 10:28PM | Last Updated: Mar 19 2018 9:44PMसोलापूर : वेणुगोपाळ गाडी

सोलापूर दौर्‍यावर आलेल्या योगगुरू रामदेवबाबांनी सोलापुरी चादर-टॉवेलसह गारमेंटची उत्पादने पतंजलीच्या ब्रँडखाली विकण्याचे आश्‍वासन दिल्याने येथील टेक्स्टाईल उद्योगाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

वैशिष्ट्यपूर्णपणे तयार होणार्‍या सोलापुरातील टेक्स्टाईलच्या उत्पादनांना एकेकाळी देशी-विदेशी बाजारपेठ मोठी होती. पण जागतिकीकरणानंतर आंतरराष्ट्रीय स्पर्धेला तोंड देताना अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. चीन, पाकिस्तान आदी देशांची उत्पादने भारताच्या तुलनेत स्वस्त असल्याने भारतीय उत्पादनांना मागणी घटली, असे कारण सोलापूरच्या उद्योगातून सांगितले जाते. यंत्रमाग उद्योगाची वार्षिक उलाढाल सध्या बाराशे ते तेराशे कोटींच्या आसपास असल्याचा जिल्हा यंत्रमागधारक संघाचा दावा आहे. सन 2013-14 , 2014-15 या आर्थिक वर्षात उलाढाल 1800 कोटींपर्यंत झाली होती, असेही संघाचे म्हणणे आहे. तेजी-मंदीच्या तुुुलनेत आकडेवारी कमी-जास्त होणे स्वाभाविक असले तरी सोलापूरच्या टेक्स्टाईलची उलाढाल क्षमता 1500 कोटींची असल्याची आश्‍वासकता देण्यात येते. म्हणूनच रामदेवबाबांनादेखील 1500 कोटींची उलाढाल असल्याची माहिती देण्यात आली.
सध्या यंत्रमाग उद्योगाची निर्यातीची वार्षिक उलाढाल चारशे कोटींपर्यंत आहे. यामध्ये 15 ते 20 टक्के यंत्रमाधारक हे आपल्या मालाची निर्यात थेट, तर उर्वरितजण एक्स्पोर्ट मर्चंटच्या माध्यमातून करतात. देशी बाजारपेठेचा विचार करता 30 टक्के कारखानदार हे आपला माल स्थानिक पातळीवर विकतात, तर उर्वरित 70 टक्के लोक आपली उत्पादने कमिशन एजंटच्या माध्यमातून देशातील विविध राज्यांत विकतात. टेक्स्टाईल उद्योगाचा अपेक्षित विकास न झाल्याच्या कारणांमध्ये मार्केटिंग हे एक प्रमुख कारण समजले जाते. पण आता जर पतंजलीने सोलापूरची टेक्स्टाईल उत्पादने घेऊन त्यांच्या ब्रँडखाली विकली तर सोलापुरातील मार्केटिंगची समस्या काही प्रमाणात सुटणे शक्य होणार आहे. रामदेवबाबांनी पतंजलीचे पाच वर्षांत 20 हजार कोटींची टेक्स्टाईल उत्पादने विकण्याचे व्हिजन जाहीर केले. यामध्ये सोलापूरची वार्षिक उलाढाल असलेल्या 1500 कोटींची उत्पादने सहज खपतील, असेही त्यांनी बोलून दाखविले. लवकरच पतंजलीच्या टेक्स्टाईलप्रमुखाला सोलापूरला अभ्यास व बोलणीसाठी पाठवू असे सांगून त्यांनी सोलापूरच्या यंत्रमागधारकांना आश्‍वासित केले आहे. हे लक्षात घेता सध्या अडचणीत असलेल्या सोलापूर टेक्स्टाईल उद्योगाला काही प्रमाणात का होईना पण ‘अच्छे दिन’ येतील, अशी आशा आहे. पतंजलीने जर उत्पादने घेण्याची हमी दिल्यास एकाच वेळी अनेक कारखानदारांना हे काम मिळणार असून दुसरीकडे कामगारांना रोजगाराची हमीही मिळून या उद्योगाला ‘अच्छे दिन’ येतील, असे जाणकारांचे म्हणणे आहे. 

solapur, patanjali, vision ,save, solapur texttile,ramdev baba,