Fri, Jul 19, 2019 05:51होमपेज › Solapur › समांतर जलवाहिनी योजनेला आठवड्यात मंजुरी देणार 

समांतर जलवाहिनी योजनेला आठवड्यात मंजुरी देणार 

Published On: Feb 13 2018 10:30PM | Last Updated: Feb 13 2018 9:40PM सोलापूर : प्रतिनिधी

महापालिकेच्या पहिल्या टप्प्यातील 692 कोटींच्या समांतर जलवाहिनी योजनेला आठवड्यात मंजुरी देऊ, असे सांगतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी स्थानिक दोन मंत्र्यांच्या गटबाजीबाबत विचारलेल्या पत्रकारांच्या प्रश्‍नाला चातुर्याने बगल दिली.

तुळजापूर तालुक्यातील कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी मंगळवारी सकाळी मुख्यमंत्री फडणवीस तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे सोलापुरात विमानाने आगमन झाले. यानंतर या दोघांनी मोटारीने तुळजापूरकडे प्रयाण केले. कार्यक्रम आटोपून दुपारी या दोघांनी होटगी रोडवरील सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या घरी उपवासाचा फराळ घेतला. यानंतर विमानतळाकडे मार्गस्थ होण्यासाठी निघालेल्या मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्रकारांनी गाठून पालकमंत्री विजयकुमार देशमुख व सहकारमंत्री सुभाष देशमुख या दोन गटांचे मनपातील वाद सुरुच असल्याबद्दल प्रश्‍न छेडला. 

यावेळी मुख्यमंत्र्यांनी मोठ्या चतुराईने हा प्रश्‍न टाळत ‘वादाचे काय बोलता, आपण विकासाविषयी बोलू’ असे म्हणत मनपाच्या समांतर जलवाहिनी योजनेला आठवड्याभरात मंजुरी देणार असल्याचे सांगितले. 

यावेळी महापौर शोभा बनशेट्टी, भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी, महापालिका परिवहन समितीचे सभापती दैदिप्य वडापूरकर, नगरसेवक नागेश वल्याळ आदी उपस्थित होते. दरम्यान, मुख्यमंत्री फराळ घेतेवेळी सोमवारी मनपा सभेत झालेल्या गटबाजीचा  विषय  निघाला नसल्याचे   समजते.