Sun, Aug 25, 2019 19:05होमपेज › Solapur › आ. भालके, आ. कदम यांचे राजीनामे

आ. भालके, आ. कदम यांचे राजीनामे

Published On: Jul 26 2018 11:04PM | Last Updated: Jul 26 2018 10:53PMपंढरपूर/मोहोळ : प्रतिनिधी

राज्यभरात मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आमदारांच्या राजीनामा सत्रामध्ये पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार भारत भालके व मोहोळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रमेश कदम यांनीही उडी घेतली असून मराठासह धनगर, महादेव कोळी आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाची मागणी करीत आ. भालके यांनी आपला विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा विधानसभा सभापतींकडे पाठवून दिला आहे. तर, आ. कदम यांनीही मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शवीत या आरक्षणाच्या मागणीसाठी आपला राजीनामा सभापतींकडे पाठविला आहे. कदम हे सध्या तुरुंगात असून ते राखीव जागेवरून निवडून आलेले आहेत. 

मराठा आरक्षणाचे आंदोलन राज्यभरात उग्र झालेले असून आरक्षणाला पाठिंब्यासाठी आमदारांकडून राजीनामे देण्याचे सत्र सुरू झाले आहे. यापूर्वी चार आमदारांनी राजीनामे दिलेले आहेत. या पार्श्‍वभूमीवर मराठा, धनगर आरक्षणासाठी पहिल्यापासून आग्रही असलेल्या आमदार भारत भालके यांनी गुरुवारी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली. त्यांनी विधानसभेच्या सभापतींकडे आपला राजीनामा ई-मेलद्वारे पाठवला आहे. या राजीनामा पत्रामध्ये आ. भालके यांनी म्हटले आहे की, पुरोगामी महाराष्ट्रामध्ये मागील तीन वर्षांमध्ये अस्थिरतेचे वातावरण निर्माण झालेले आहे. मराठा, धनगर, महादेव कोळी, मुस्लिम या समाजांच्या हक्काचे आरक्षण मिळावे, ही मागणी वारंवार केली जात आहे. यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी या सर्व समाजांना लेखी व तोंडी आरक्षणाचे आश्‍वासन दिलेले आहे. मात्र तरीही आजपर्यंत आरक्षणाचा ठोस निर्णय झालेला नाही. ही गंभीर बाब असून या सर्व समाजांच्या भावना तीव्र झालेल्या आहेत. राज्यभरात आंदोलनाचा भडका उडालेला आहे. या परिस्थितीत  या सर्व समाजांचा लोकप्रतिनिधी म्हणून मला या पदावर राहण्यात नैतिकता वाटत नाही म्हणून मी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा सदस्यपदाचा राजीनामा देत आहे. आ. भालके यांच्या राजीनामाप्रसंगी काँग्रेसचे पदाधिकारी व मराठा समाजातील कार्यकर्ते, आ. भालके गटाचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बहुतांश पदाधिकारी, कार्यकर्ते आ. भालके यांना राजीनामा देऊ नका, अशी विनंती करीत होते. मात्र तरीही भालके यांनी आपला राजीनामा दिला असून संपूर्ण तालुक्यात यानंतर आश्‍चर्य व्यक्त होत आहे. 

दुसरीकडे मराठा समाजाला आरक्षण मिळावे या आग्रही मागणीसाठी मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे व सध्या तुरुंगात असलेले आमदार रमेश कदम यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. याबाबत त्यांनी आपल्या लेखी राजीनाम्याचे पत्र विधानसभा सभापतींकडे पाठविले आहे. पत्रात आ. कदम यांनी नमूद केले की, मराठा समाज  स्वतंत्र आरक्षणाची न्याय्य मागणी करत असून हा समाज आजही मुख्य प्रवाहापासून वंचित आहे. त्यांच्या मागणीला माझा पूर्ण पाठिंबा आहे.  मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्यामुळेच मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देत आहे.  तो राजीनामा मंजूर करण्यात यावा, अशा आशयाचे लेखी पत्र त्यांनी दिले आहे. हे पत्र सोशल मीडियावरदेखील व्हायरल झाले आहे. मोहोळ तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

राजीनाम्यावर हिवाळी  अधिवेशनात निर्णय

या आमदारांनी राजीनामे दिले असले तरी त्यावर हिवाळी अधिवेशनातच निर्णय होऊ शकतो. आमदारांनी राजीनामे दिल्यानंतर ते मंजुरीसाठी विधानसभेत मांडले जातात. सभागृहाच्या मंजुरीनंतरच ते मान्य केले जाऊ शकतात, असे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी स्पष्ट केले आहे. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेेशन 19 नोव्हेंबरपासून मुंबईत होणार आहे. या अधिवेशनात या राजीनाम्यावर निर्णय होऊ शकतो. त्यामुळे 19 नोव्हेंबरपर्यंत तरी या आमदारांची आमदारकी कायम राहणार आहे.

आणखी तीन आमदारांचे राजीनामे

नाशिकमधील देवळा चांदवड मतदारसंघाचे आमदार डॉ. राहुल आहेर आणि नाशिक पश्‍चिमच्या आमदार सीमा हिरे यांनीदेखील राजीनामा दिला आहे. हे दोन्ही आमदार भाजपचे आहेत. आपल्याला आमदारकीपेक्षा समाज मोठा असल्याचे सांगत दोघांनी मराठा मोर्चाच्या समन्वयकांकडे आपले राजीनामे सोपविले आहेत. तसेच इंदापूरचे आ. दत्तात्रय भरणे यांनीही विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्याकडे पाठविला असल्याचे जाहीर केले.