Sun, May 26, 2019 08:35होमपेज › Solapur › सोलापूर जिल्ह्यात अवकाळी पाऊस

सोलापूर जिल्ह्यात अवकाळी पाऊस

Published On: Apr 17 2018 10:33PM | Last Updated: Apr 17 2018 10:22PMसोलापूर/पंढरपूर : प्रतिनिधी

सोलापूर शहर व परिसरात मंगळवारी सायंकाळी विजेच्या कडकडाटांसह अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. पंढरपूर परिसरातही अनेक ठिकाणी पावसाने चांगलेच झोडपले.सोलापूर शहरात सायंकाळी पाच वाजल्यापासूनच हवेत गारवा निर्माण होऊन विजेच्या कडकडाटांसह अल्पसा पाऊस पडला. मोहोळ परिसरात जोराचा वारा सुटला होता. मेघगर्जनेसह पावसाच्या सरी बरसल्या. बोंडले, करकंब, वैराग, माढा शहर तसेच अक्कलकोट परिसरात विजेच्या कडकडाटांसह पाऊस पडल्याचे वृत्त आहे. सांगोला तालुक्यात सायंकाळी जोरदार वारे वाहत होते. जिल्ह्यात ठिकठिकाणी झालेल्या पावसाच्या शिडकाव्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. माळीनगर परिसरातही पावसाच्या दमदार सरी कोसळल्या.

पंढरपूर शहर व परिसरात काही ठिकाणी जोरदार वार्‍यासह पाऊस पडल्याचे वृत्त आहे. टेंभुर्णी येथे पावसाच्या अल्प सरी कोसळल्या असल्या तरी जोरदार वार्‍यामुळे आंबा, डाळिंब आदी बागायती पिकांचे नुकसान झाले आहे. 

आमचे पंढरपूरचे प्रतिनिधी कळवतात की शहर व तालुक्यात मंगळवारी सायंकाळी 6 वाजता वादळी वार्‍यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. सुमारे एक ते दिड तास वादळी वारे व वीजेचा गडगडाटानंतर अवकाळी पावसाच्या हलक्या सरी तालूक्याच्या दक्षिण व पुर्व भागात कोसळल्या आहेत. त्यामूळे आंबा, द्राक्षे, बेदाना आदीचे मोठे नुकसान झाले आहे. 

मंगळवारी सकाळपासून नेहमीपेक्षा जास्त उकाडा जाणवत होता. तापमान 40 अंश सेल्शिअसच्या पुढे गेले होते. त्यामूळे उकाड्याने व उन्हाच्या झळांनी नागरिक हैराण झाले आहेत. यातच सायंकाळी 5.30 च्या दरम्यान आकाशात ढगाळ वातावरण तयार झाले. तर सायंकाळी 6 वाजता अचानक वादळी वारा वाहू लागला. या वादळी वार्‍याने धुळीचे लोट वाहत होते. याचा त्रास आठवडी बाजारात आलेल्या व्यापारी, ग्राहकांना सहन करावा लागला. तर वादळी वार्‍याने व अवकाळी पावसाने कासेगाव येथील  विठ्ठल दशरथ पडळकर यांची उतरणीला आलेली द्राक्षेची बाग मोडून पडली आहे. द्राक्षे बागेचे मोठे नुकसान झाले आहे. अशीच परिस्थिती सरकोली, अनवली, कासेगाव, भाळवणी, करकंब या भागातील द्राक्षे बागांची झाली आहे. द्राक्षेबागांसह आंब्यांच्या कैर्‍या गळून पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. तर वादळात मोठ्या प्रमाणात धुळीचे लोट वाहत असल्याने शेडवर टाकण्यात आलेल्या बेदान्याचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी झाडे रस्त्यावर उन्मळून पडली आहेत. वाखरी, भंडीशेगाव, शेळवे परिसरात जोरदार पाऊस झाला.

वादळी वार्‍यासह वीजेचा गडगडाट सुरु राहिल्याने सायंकाळी 7 वाजता शहरात अवकाळी पाऊस सुरु झाला. यामूळे आज होणार्‍या अक्षयतृतीय सणानिमित्त आठवडी बाजारात खरेदीसाठी आलेल्या ग्राहक व व्यापार्‍यांची तारांबळ उडाली. रात्री उशिरापर्यंत वादळी वारा व अवकाळीची रिमझिम सुरु होती.