होमपेज › Solapur › पालखीमार्गावरील ६३ गावांना १ कोटी १३ लाखांचा निधी

पालखीमार्गावरील ६३ गावांना १ कोटी १३ लाखांचा निधी

Published On: Jul 06 2018 10:13PM | Last Updated: Jul 06 2018 10:01PMसोलापूर : प्रतिनिधी

आषाढी एकादशीनिमित्त सोलापूर जिल्ह्यात दाखल होणार्‍या 63 गावांतील पालख्यांतील वारकर्‍यांना किमान मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी जिल्हा परिषदेकडून 1 कोटी 13 लाखांच्या निधीतून नियोजन करण्यात येत आहे. संत ज्ञानेश्‍वर महाराज व संत तुकाराम महाराजांची पालखी ज्या गावात मुक्कामी असणार आहे, त्या ग्रामपंचायतीस 4 लाखाचा निधी देण्यात येत आहे. 

सोलापूर जिल्ह्यात संत ज्ञानेश्‍वर, संत तुकाराम, संत सोपानकाका, संत नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज, संत निवृत्तीनाथ महाराज, संत गजानन महाराज, संत निळोबा, संत मुक्ताई आदी 9 संतांच्या प्रमुख पालख्या सोलापूर जिल्ह्यात येतात. या पालख्यासोबत आलेल्या लाखो वारकर्‍यांना किमान सुविधा देण्याचा प्रयत्न जिल्हा परिषदेकडून होत आहे. संत ज्ञानेश्‍वर व संत तुकाराम महाराज यांच्या दुपारच्या विसाव्यासाठी ग्रामपंचायतींना दोन लाख, तर सकाळच्या विसाव्यासाठी 1 लाखाचा निधी ग्रामपंचायतींना देण्यात येत आहे. याशिवाय अन्य पालख्यांतील वारकर्‍यांच्या सुविधेसाठी प्रत्येकी दोन लाख रुपयांपर्यंत निधी देण्यात येत आहे. आषाढी वारीनिमित्त दाखल होणार्‍या वारकर्‍यांना पिण्याचे शुध्द पाणी, आरोग्य सुविधा, स्वच्छता आदी सुविधा मिळाव्यात याकरीता नियोजन करण्यासाठी 9 जुलै रोजी 63 गावातील सरपंच व ग्रामसेवकांची बैठक जिल्हा परिषदेत घेण्यात येणार असल्याची माहिती जि.प. ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील यांनी दिली.