Tue, Jun 25, 2019 22:08होमपेज › Solapur › ओटीएस योजनेतील १४ हजार शेतकर्‍यांसाठी १७७ कोटींची मागणी

ओटीएस योजनेतील १४ हजार शेतकर्‍यांसाठी १७७ कोटींची मागणी

Published On: Dec 19 2017 2:06AM | Last Updated: Dec 18 2017 9:28PM

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी    

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकर्‍यांना एकरकमी कर्ज परतफेड योजनेचा लाभ व्हावा यासाठी पात्र असणार्‍या 14 हजार शेतकर्‍यांसाठी 177 कोटी रुपयांची मागणी शासनाकडे केली असल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजन पाटील यांनी दिली.

शासनाने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेतून दीड लाखपर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली होती. त्यापैकी दीड लाख रुपयांपेक्षा कमी कर्ज असलेल्या जवळपास सर्वच शेतकर्‍यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात आले आहेत. दुसरीकडे ज्या-ज्या शेतकर्‍यांचे कर्ज दीड लाख रुपयांपेक्षा अधिक आहे अशा शेतकर्‍यांना एकरकमी कर्ज परतफेड योजना राबविण्यात आली असून अशा शेतकर्‍यांनी येत्या 31 मार्चपर्यंत दीड लाख रुपयांपेक्षा अधिक असणारी रक्कम बँकेला भरल्यास दीड लाख रुपये शासनाकडून त्यांच्या कर्ज खात्याला जमा करण्यात येणार आहेत. त्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यावतीने पात्र शेतकर्‍यांची यादी काढण्यात आली असून यामध्ये जवळपास 14 हजार शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरले आहेत. त्यांना या योजनेचा लाभ देण्यासाठी किमान 177 कोटी रुपये लागणार असून तशी मागणी शासनाकडे करण्यात आली असल्याची माहिती राजन पाटील यांनी दिली. दुसरीकडे कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या 8 हजार 323 शेतकर्‍यांची यादी बँकेने शासनच्या वेबसाईटवर अपलोड केली होती. यापैकी अनेक लाभार्थ्यांची तपासणी केली होती; मात्र ती यादी सध्या वेबपोर्टलवर दिसत नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे कर्जमाफीच्या कामात पुन्हा अडथळे निर्माण झाले आहेत.