Thu, Jun 27, 2019 15:43होमपेज › Solapur › ...तर विरोधी पक्ष मनपा बरखास्तीचा विषय आणेल

...तर विरोधी पक्ष मनपा बरखास्तीचा विषय आणेल

Published On: Feb 13 2018 1:58AM | Last Updated: Feb 12 2018 9:33PM सोलापूर : प्रतिनिधी

महापालिका सभेतील सत्ताधारी भाजपमधील अंतर्गत गटबाजीचा उबग आला आहे. आणखीन तीन सभा पाहू. गटबाजी सुरुच असल्यास विरोधी पक्षांकडून मनपा बरखास्तीचा विषय आणण्याशिवाय पर्याय नाही, या शब्दांत महापालिकेतील शिवसेना वगळता उर्वरित विरोधी पक्षांनी महापौर शोभा बनशेट्टी यांच्याजवळ आपली उद्विग्नता व्यक्त केली. 

महापालिकेची नोव्हेंबरची तहकूब सभा सोमवारी महापौर शोभा बनशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेत सूचना वाचण्यासाठी प्रभारी सभागृहनेते म्हणून पालकमंत्री व सहकारमंत्री गटाचे अनुक्रमे श्रीनिवास रिकमल्ले व नागेश वल्याळ असे दोघे एकाच वेळी उभे राहिल्याने सारे सभागृह अवाक् झाले. यानंतर महापौरांच्या सूचनेनुसार वल्याळ यांनी सूचना वाचण्यास सुरुवात केली. या विषयांवर विरोधकांना बोलण्याची संधी दिली जात नसल्याने शिवसेना वगळता उर्वरित काँग्रेस, राष्ट्रवादी, एमआयएम, बसप, माकप या विरोधी पक्षांचे सदस्य जाम खवळले. यावरुन मोठा गदारोळ झाला. शेवटी सर्व विषयांना गोंधळातच दुरूस्तीसह बहुमताने मंजुरी देत महापौरांनी सभा गुंडाळली. यानंतर   काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे, राष्ट्रवादीचे गटनेते किसन जाधव,  एमआयएमचे गटनेते तौफिक शेख, बसपचे गटनेते आनंद चंदनशिवे आदींनी नगरसेवकांसह महापौर कक्षात जाऊन महापौर बनशेट्टी यांची भेट घेतली. 

यावेळी नरोटे म्हणाले, गटबाजीमुळे शहराचा विकास ठप्प झाला आहे. चालू आर्थिक वर्ष संपायला आले तरी निधी न मिळाल्याने विकासकामे रखडली आहेत. अशात सत्ताधारी भाजपची गटबाजी सुरुच आहे. या गटबाजीचा अक्षरश: कहर झाला आहे.

 त्यामुळे आणखीन तीन सभा पाहू. जर गटबाजी थांबत नसेल विरोधी पक्ष मनपा बरखास्तीचा विषय आणेल. राष्ट्रवादीचे जाधव म्हणाले, नगरसेवकांना निधी मिळत नसल्याने प्रभागात फिरणे मुश्किल झाले आहे. शहर विकासासाठी आम्ही सत्ताधार्‍यांना जरुर साथ देऊ, पण  सत्ताधार्‍यांनी विरोधकांना विश्‍वासात घेऊन काम केले पाहिजे.

पान-तंबाखूबाबत चंदनशिवेंची सूचना

बसपचे चंदनशिवे म्हणाले, सभागृहात आधी लक्षवेधी मांडायला संधी  द्यावी  नंतर सभेच्या अजेंड्यावरील विषयांवर कामकाज होणे अपेक्षित आहे. शहर विकासाबाबत बसपसह सर्व विरोधी पक्षांची सत्ताधार्‍यांना साथ राहणार आहे. पान-तंबाखू खाऊन सभागृहात येणार्‍या नगरसेवकांना मज्जाव करावा. एमआयएमचे शेख म्हणाले, सभागृहात भाजपमधील गटबाजीचे पुन्हा प्रत्यंतर आले. सत्ताधारी नगरसेवकांनी सभात्याग केला, हे अयोग्य आहे. सभेतील विषयांवर प्रत्येकाला बोलायला संधी देण्यात यावी.  लक्षवेधी मांडण्याबाबत नगरसेविकांना प्राधान्य देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. ती महापौरांनी मान्य केली. महत्त्वाचे विषय तसेच सभेबाबत सर्व गटनेत्यांसमवेत बैठक घेणार असल्याचेही महापौरांनी यावेळी सांगितले.