Thu, Jul 18, 2019 02:36होमपेज › Solapur › मंदिर समितीचा आपत्कालीन रस्त्याला विरोध

मंदिर समितीचा आपत्कालीन रस्त्याला विरोध

Published On: Dec 12 2017 2:11AM | Last Updated: Dec 11 2017 10:30PM

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

सिद्धेश्‍वर यात्रा आपत्कालीन आराखड्यानुसार होणार असून, मंदिर समितीला विश्‍वासात घेऊन आराखडा तयार करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली.

ग्रामदैवत सिद्धरामेश्‍वर यात्रेच्या  पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांतील अधिकार्‍यांच्या  आयोजित  यात्रा पूर्वनियोजन बैठकीत ते बोलत होते. शासनाने 7 मार्च 2005 चे परिपत्रकात दिल्याप्रमाणे यात्रेचे नियोजन करण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासन तसेच विविध विभाग व मंदिर समिती यांना विश्‍वासात घेऊन आपत्कालीन आराखडा तयार करण्यात येणार आहे. शासनाच्या निर्देशानुसार यात्रा होणार असून, धार्मिक विधीला कोणताही अडथळा होणार नाही. यात्रा सुरळीतपणे पार पडेल, अशा पद्धतीने कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना यावेळी जिल्हाधिकार्‍यांनी दिल्या.

यावेळी त्यांनी विविध विभागांकडून यात्रेसंदर्भात केलेल्या नियोजित कामाचा आढावाही घेतला. यावेळी महानगरपालिका, पोलिस प्रशासन, महावितरण सार्वजनिक बांधकाम विभाग आदींनी यात्रेच्या तयारी संदर्भात या बैठकीत माहिती दिली.

यात्रा नियोजन संदर्भात ही पहिलीच बैठक होती. या बैठकीत मंदिर समितीतर्फे धर्मराज काडादी हे बैठकीस हजर होते. त्यांनी गेली दोन वर्षे ज्या मुद्यावर वाद निर्माण झाले होते, त्या मुद्दाला या बैठकीत विरोध केला. त्यांनी आपत्कालीन रस्त्याची गरज नसल्याचे सांगत आपत्कालीन रस्त्याला विरोध केला. 

माणसे महत्त्वाची की दुकाने  ः जिल्हाधिकारी

सिध्देश्‍वर यात्रेत मोठ्या प्रमाणात भाविक येतात. या भाविकांची सुरक्षा महत्त्वाची असते. त्यामुळे त्यासुरक्षेचा प्रथम विचार केला जातो. एखादी दुर्घटना होवू नये म्हणून आपत्कालीन रस्त्याची आवश्यकता असून याच रस्त्याची आवश्यकता नसल्याचे मंदिर समिती सांगत असून माणसापेक्षा दुकाने महत्त्वाची आहेत का, असा सवाल यावेळी जिल्हाधिकार्‍यांनी काडादी यांना विचारला. 

आपत्ती ही सांगून येत नाही ः पोलिस आयुक्त ताबंडे 

न्यायालयाच्या आदेशानुसार आपत्कालीन आराखडा तयार करण्यात येतो. या आराखड्यानुसार प्रशासन नियोजन करते. जेणेकरून एखादी आपत्ती आली तर त्या आपत्तीचा सामना कसा करायचा, याचे नियोजन केले जाते. यासाठी आपत्ती व्यवस्थापन आराखडा आवश्यक असल्याचे सांगत कोणतीही आपत्ती ही  सांगून येत नसल्याचे यावेळी पोलिस आयुक्त महादेव तांबडे यांनी सांगितले.

सर्व विभागाच्या सूचनांचे पालन करून मंदिर समितीला विश्‍वासात घेऊन यात्रेचा कृती आराखडा तयार करण्यात येईल आणि त्यानंतर या आराखड्यास मंजुरी देण्यात येईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

यावेळी प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे,  प्रांताधिकारी शिवाजी जगताप, जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमंत पाटोळे, मंदिर समितीचे विश्‍वनाथ आळंगे, आर.एस. पाटील, बाळासाहेब भोगडे, राजू हौशेट्टी तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.