Sat, Mar 23, 2019 02:16होमपेज › Solapur › ऑनलाईनमध्ये लटकला जिल्ह्यातील गावांचा विकास

ऑनलाईनमध्ये लटकला जिल्ह्यातील गावांचा विकास

Published On: Dec 01 2017 9:08AM | Last Updated: Nov 30 2017 10:03PM

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी    

राज्य शासनाने अनेक गोष्टींत पारदर्शकता यावी यासाठी आधुनिकतेचा वापर करण्याचा प्रयत्न सुरु केला असून जिल्ह्यातील हजारो गावांच्या विकासासाठी देण्यात येणार्‍या चौदाव्या वित्त आयोगासाठीही आता आराखडे ऑनलाईन करण्याचा अट्टाहास शासनाने धरला आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून जिल्ह्यातील चौदाव्या वित्त आयोगाचे आराखडे मंजूर होऊ शकले नाहीत. त्यामुळे जिल्ह्यासाठी आलेले 200 कोटी रुपये अखर्चित राहिले आहेत.

गावच्या सर्वांगीण विकासासाठी चौदाव्या वित्त आयोगातून थेट ग्रामपंचायतींना  निधी देण्याचे धोरण शासनाने ठेवले होते. त्यानुसार चौदाव्या वित्त आयोगाचे आराखडे तयार करण्याचे अधिकार ग्रामपंचायतींना दिले असले तरी ते आराखडे मंजूर करण्याचे अधिकार पंचायत समितीला देण्यात आले आहेत. त्यामध्ये आता भरीसभर म्हणून हे आराखडे ऑनलाईन करण्याच्या सूचना नव्याने देण्यात आल्या आहेत. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून ग्रामपंचायतींची अनेक विकासकामे खोळंबून पडली आहेत.गेल्या तीन वर्षांपासून सुरु झालेल्या योजनेत अनेक जाचक अटी घालण्यात आल्या आहेत. यामध्ये महिला व बालकल्याण, समाजकल्याण, अपंगकल्याण तसेच शाळा विकास यासाठी काही निधी खर्च करण्याचे बंधन घातले आहे. मात्र त्यासाठी आवश्यक असणार्‍या सूचना अथवा नियमावली ग्रामपंचायतींना दिलेली नाही. त्यामुळे या निधीचा विनियोग कसा करायचा यावरुन आता मोठा गदारोळ सुरु झाला आहे. सन 2017-18 या आर्थिक वर्षासाठी 61 कोटी 80 लाख  30 हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. मात्र आराखडा मंजूर झाल्याशिवाय हा निधी खर्च करता येणार नाही. दुसरीकडे पंचायत समिती हे आराखडे मंजूर करुन देत नाही. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून ग्रामपंचापयतींचा कारभार ठप्प झाला आहे. एकदा आराखडे मंजूर झाले की त्यामध्ये बदल करण्याचा कोणताच अधिकार ग्रामपंचातींना ठेवण्यात आलेला नाही. त्यामुळे जर तातडीने काही काम हाती घेण्याची वेळ आली तर त्याला पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेची परवानगी घ्यावी लागते. त्यामुळे पुन्हा त्यामध्ये वेळ जात असल्याने यामध्ये सर्वाधिकार ग्रामपंचायतींनाच द्यावेत, अशी मागणी सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींतून आता पुढे येत आहे.