Sat, Apr 20, 2019 16:06होमपेज › Solapur › दोन दिवसाआड पाणी; पालकमंत्र्यांकडून गाजर

दोन दिवसाआड पाणी; पालकमंत्र्यांकडून गाजर

Published On: May 20 2018 10:25PM | Last Updated: May 20 2018 9:21PMसोलापूर : वेणुगोपाळ गाडी

गल्ली ते दिल्ली सत्ता असूनही गेल्या सव्वा वर्षात शहराचा विकास साधण्यात पूर्णत: अपयश आलेल्या भाजपच्या पालकमंत्र्यांनी चक्क दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे दिलेले आश्‍वासन केवळ गाजरच ठरण्याची चिन्हे आहेत. निवडणुका तोंडावर आल्याने पालकमंत्र्यांना जाग आल्याचे यावरून स्पष्ट होते. कारण सतत दोन वर्षे उजनी धरण ओसंडून वाहत असताना शहराचा पाणीपुरवठा सातत्याने विस्कळीत असताना पालकमंत्र्यांना का जाग आली नाही, असा संतप्त सवाल सोलापूरकर करीत आहेत.

महापालिकेत भाजपची सत्ता येऊन सव्वा वर्ष लोटले, मात्र गटबाजीच्या राजकारणात आकंठ बुडालेल्या सत्ताधारी भाजपची पाटी कोरीच राहिली. वास्तविक केंद्र, राज्यानंतर भाजपने सोलापूर मनपाची सत्ता काबीज केल्यानंतर एकाच पक्षाचे सरकार सर्वत्र असल्याने शहराचा कायापालट होईल, अशी अपेक्षा होती, मात्र सत्ताधार्‍यांच्या नाकर्तेपणामुळे जनतेचा भ्रमनिरास झाला आहे. स्थानिक दोन मंत्री व खासदार भाजपचा असताना या तिघांनीही एकमेकांच्या समन्वयातून शहराचा कालबद्ध विकास करुन दिलेल्या आश्‍वासनांची पूर्ती करण्याच्या दृष्टीने पावले टाकणे गरजचे होते, मात्र या तिघांची तोंडे तीन दिशेला असल्याने शहराला ‘बुरे’ दिन आल्याची टीका सर्वत्र होताना दिसते.

पाणी हा शहराच्या कळीचा मुद्दा. मनपा निवडणुकीत दैनंदिन पाणीपुरवठ्याचे आश्‍वासन देणार्‍या भाजपने सत्ता आल्यावर यादृष्टीने काहीच नियोजन केले नाही. पालकमंत्री, सहकारमंत्री असो वा मनपाचे पदाधिकारी सार्‍यांनी गटबाजीमध्येच धन्यता मानली, परिणामी पाणी प्रश्‍न आणखीन गहन बनला आहे. उजनी धरण शंभर टक्के भरले असताना शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा करणे शक्य होते, मात्र  प्रशासन ते शक्य नसल्याचे कारण देते. समांतर जलवाहिनीची योजना राबवून पाणीसाठा करण्याची क्षमता वाढविल्यास तसेच शहरांतर्गत वितरण व्यवस्थेतील दोष दूर केल्यास एक दिवसाआड पाणीपुरवठा करणे शक्य होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात येते.

पाणीपुरवठा सुधारण्यासाठी चार-पाच वर्षांपूर्वी 1240 कोटींच्या योजनेचा प्रस्ताव मनपाने बनविला होता, मात्र एवढ्या मोठ्या रक्कमेच्या योजनेला शासनाने मान्यता न देता यापैकी केवळ 439 कोटींच्या समांतर जलवाहिनी योजनेला मान्यता दिली. हा विषय मनपा सभेत गत महिन्यात मंजूर करताना विरोधी पक्षांनी उर्वरित रक्कमेच्या योजनेचा प्रस्तावही शासनाकडे पाठविण्याची आग्रही मागणी केली. हा प्रस्ताव पुढील सभेत ठेवण्याचे आश्‍वासन सत्ताधार्‍यांनी दिले होते, मात्र मे महिन्याच्या सभेत विषय आला नाही, हे विशेष. जर यदाकदाचित हा विषय आलाच तर शासन मंजुरी देईल की नाही हा प्रश्‍न आहे.