होमपेज › Solapur › पुन्हा एकदा चलनकल्लोळ

पुन्हा एकदा चलनकल्लोळ

Published On: Apr 17 2018 10:33PM | Last Updated: Apr 17 2018 10:03PMसोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर शहरातील बहुतांश एटीएममध्ये खडखडाट निर्माण झाला आहे. बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया, आडीबीआय, युनायटेड बँक, युको बँक, कॅनरा बँक, अ‍ॅक्सिस बँकेसह खासगी बँकांच्या एटीएममध्ये ‘नो कॅश’ किंवा ‘आऊट ऑफ सर्व्हिस’ असे फलक लावण्यात आले आहेत.त्यामुळे नागरिकांना पुन्हा एकदा नोटाबंदीचा काळ आठवू लागला आहे. नागरिक बँक प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करत असतानाचे चित्र निर्माण झाले आहे.

8 नोव्हेंबर 2016 रोजी भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 व 1000 रुपयांच्या नोटांचे लिगल टेंडर रद्द केले होते. म्हणजेच 500 व 1000 रुपयांच्या नोटा भारतीय चलनातून रद्द करण्यात आल्या होत्या. त्याऐवजी नवीन 500 रुपयांची नोट व 2000 रुपयांची नोट चलनात आणली होती.नोटाबंदीनंतर संपूर्ण भारतामध्ये चलनकल्लोळ निर्माण झाला होता. 

आरबीआयने नोटाबंदीनंतर 5 लाख कोटी रुपयांच्या 2 हजारच्या नोटा चलनात आणल्या होत्या. या नोटा चलनात आल्यामुळे चलन तुटवड्याचा प्रश्‍न बर्‍याच प्रमाणात कमी झाला होता. पण हे संकट आता पुन्हा एकदा निर्माण झाले आहे. काही बँकांच्या मते चलन जमा करण्याच्या सवयीमुळे हा तुटवडा निर्माण झाला आहे. 

आरबीआयकडून मिळालेल्या  माहितीनुसार 6 एप्रिल रोजी 18.2 लाख कोटी रुपये चलनात होते. ही आकडेवारी नोटाबंदीच्या आधी बाजारात असलेल्या चलनाइतकी होती. देशात आवश्यक प्रमाणात चलन उपलब्ध आहे. नोटाबंदीनंतर सरकारने डिजिटल व्यवहारांना अधिक प्रोत्साहन दिल्याने प्रत्यक्षात चलनाची मागणी कमी झाली होती. पण आता निर्माण झालेल्या चलनटंचाईमुळे काळजी वाढली आहे. आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यात मार्च महिन्यात   चलन तुटवड्याची माहिती प्रसारमध्यामांतून आली होती, पण तेव्हा याकडे केंद्र सरकारने व बँकिंग व्यवस्थेने फार गांभीर्याने बघितलेे  नाही. याचा दुष्परिणाम आता नागरिकांना सोसावा लागत आहे. मार्च 2018 मध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात डिपॉझिट 6.7 टक्के इतके होते. 2016-17 मध्ये हा दर 15.3 टक्के इतका होता. 

याउलट 2018 या आर्थिक वर्षात पैसे काढून घेण्याचे प्रमाण 10.3 टक्के इतके होते. हेच प्रमाण 2016-17 या आर्थिक वर्षात 8.2 टक्के इतके होते.रोख रकमा काढणार्‍यांची संख्या वाढल्याने हा चलन तुटवडा निर्माण  झाला असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.