Thu, Jul 18, 2019 02:26होमपेज › Solapur › सोलापूर :  कुर्‍हाडधारी वृध्दाचा न्यायाधीशांशी वाद

सोलापूर : कुर्‍हाडधारी वृध्दाचा न्यायाधीशांशी वाद

Published On: Dec 20 2017 6:22PM | Last Updated: Dec 20 2017 7:59PM

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

माहिती अधिकार अर्जाच्या पोहोचवर न्यायाधीशांचीच सही पाहिजे, असे म्हणून एका वृद्धाने कुर्‍हाड घेऊन वादावादी घातली. न्यायाधीशांवर हल्ल्याच्या प्रयत्नात असतानाच यावेळी साक्षीसाठी न्यायालयात आलेल्या पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांनी झडप  घालून  हत्यारानिशी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील पिशवीची तपासणी केली असता कोयता आणि हेक्सा ब्लेडचे पाते मिळून आले. 

पोपट शामराव नलावडे (वय 67, रा. हळदुगे, ता. बार्शी)  असे  या वृद्धाचे नाव आहे. या घटनेमुळे सोलापूर जिल्हा  न्यायालयात एकच खळबळ  उडाली असून, यामुळे सोलापूर जिल्हा न्यायालयाच्या सुरक्षा व्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. गेल्या दोन महिन्यांतील न्यायाधीशांवरील हल्ल्यांच्या प्रयत्नाची ही दुसरी घटना असल्यामुळे न्यायाधीश व वकीलवर्गामध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. 

पोपट नलावडे हे बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास अतिरिक्त सत्र न्यायाधीश हेजीब यांच्या न्यायालयात माहिती अधिकाराचा अर्ज देण्यासाठी आले होते. त्यावेळी न्यायालयातील कर्मचार्‍याने नलावडे यांना अर्जावर पोहोच दिली असता नलावडे यांनी ती न घेता न्यायाधीशांनीच त्यांच्या सहीनिशी पोहोच द्यावी म्हणून कर्मचार्‍याशी वाद घातला. त्यावेळी  डायसवर असलेल्या न्यायाधीशांनी नलावडे यांच्याशी बातचीत केली असता नलावडे यांनी त्यांच्याकडील कुर्‍हाड हातात घेऊन ती न्यायाधीशांच्या दिशेने उगारत  वाद घालण्यास सुरुवात केली.

न्या. हेजीब यांच्या कक्षात आलेल्या अ‍ॅड. दीपा मडूर यांना हे चित्र दिसल्यानंतर त्यांनी पळतच व्हरांड्यात येऊन अ‍ॅड. निलेश जोशी यांच्याशी बोलत असलेल्या व सोलापूर न्यायालयात साक्षीसाठी आलेल्या दौंड-नानवीज पोलिस प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्या पोलिस अधीक्षक मनिषा दुबुले  यांना सांगितली. यावेळी दुबुले यांनी त्यांना  भेटण्यासाठी आलेले पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र राठोड, सहायक फौजदार इनामदार,  हवालदार खंडागळे, यादवाड, एन. टी. गायकवाड यांच्यासह न्यायाधीश हेजीब यांच्या कोर्ट रुमकडे धाव घेतली. त्यावेळी नलावडे हे न्यायाधीशांच्या दिशेने हातात कुर्‍हाड घेऊन उगारत असल्याचे दिसल्याने अधीक्षक दुबुले  व इतर कर्मचार्‍यांनी नलावडे यांना समजविण्याचा प्रयत्न केला, परंतु तो सफल झाला नाही. दुबुले यांनी एकीकडे नलावडे यांना बोलण्यात गुंगवून अखेर 20-25 मिनिटांनंतर पोलिस उपनिरीक्षक राठोड व हवालदार खंडागळे यांनी मिळून नलावडे यांना शिताफीने पकडून ताब्यात घेतले.  नलावडे यांच्याकडील पिशवीची तपासणी केली असता पिशवीमध्ये एक कोयता व हेक्सा ब्लेड, कागदपत्रे मिळून आली. दुबुले व त्यांना भेटण्यासाठी आलेल्या पोलिस अधिकारी-कर्मचार्‍यांनी वेळीच धाडस  दाखवित वृद्धाला ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला.

याची माहिती मिळताच सहायक पोलिस आयुक्त संजय भांबुरे, पोलिस निरीक्षक  संजय जगताप, सहायक पोलिस निरीक्षक कोळेकर, पोलिस उपनिरीक्षक बनकर आदींनी  न्यायालयात धाव घेऊन नलावडे यांना ताब्यात  घेऊन  जेलरोड पोलिस ठाण्यात आणले. याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.