Fri, Apr 26, 2019 18:06होमपेज › Solapur › आता रेल्वेस्थानकावर लवकरच प्रवाशांसाठी ‘लिफ्ट’ची सोय

आता रेल्वेस्थानकावर लवकरच प्रवाशांसाठी ‘लिफ्ट’ची सोय

Published On: Dec 14 2017 1:47AM | Last Updated: Dec 13 2017 9:04PM

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर रेल्वेस्थानकावर प्रवाशांच्या सुविधेसाठी येत्या काही दिवसांत लिफ्ट सेवा मिळण्यास प्रारंभ होणार असल्याची माहिती रेल्वे सूत्रांकडून देण्यात आली. गेल्या दीड वर्षापासून सुरु असलेले लिफ्टचे काम अखेर पूर्ण झाले आहे. एकावेळी 844 किलोग्रॅम वजन वहन करण्याची क्षमता या लिफ्टमध्ये आहे. फलाट क्रमांक 1, 2, 3 याठिकाणी पुण्याच्या दिशेने असलेल्या पादचारी पुलावर दोन लिफ्ट बसवल्या आहेत. एकावेळी 10 ते 15 प्रवासी याचा वापर करू शकणार आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी तेथे लिफ्टमॅनची नेमणूक केली जाणार आहे.

 सोलापूर रेल्वेस्थानकावर दोन लिफ्ट व एक सरकता जीना मंजूर झाला होता. त्यानुसार लिफ्टचे काम मे 2016 मध्ये सुरु झाले होते.गेल्या दीड वर्षापासून प्लॅटफार्म क्रमांक 1, 2 व 3 वर कामकाज सुरु करण्यात आले होते. सोलापूर रेल्वे डिव्हिजनमध्ये एकूण चार लिफ्ट मंजूर झाल्या होत्या. त्यामधील दोन लिफ्ट गुलबर्गा रेल्वेस्थानकावर बसवण्यात आल्या आहेत व दोन लिफ्ट सोलापूर रेल्वेस्थानकावर सज्ज करण्यात आल्या आहेत. या चारही लिफ्टच्या कामासाठी विद्युतीकरणासाठी तब्बल 4 करोड 12 लाख रुपयांचे टेंडर मंजूर करण्यात आले आहे. सोलापूर रेल्वेस्थानकावरील दोन लिफ्टच्या विद्युतीकरणाच्या  कामासाठी 70 लाख 8 हजार रुपये मंजूर झाले आहेत.चेन्नई येथील जॉन्सन या कंपनीकडे या लिफ्ट बसवण्याचा ठेका देण्यात आला आहे. सरकत्या जिन्याचे टेंडरदेखील जॉन्सन या कंपनीला देण्यात आले आहे. मे 2016 साली मंजूर झालेल्या सरकत्या जिन्याचे कामकाज अद्यापपर्यंत सुरु झाले नाही. साईनगर शिर्डी व सोलापूर अशा दोन रेल्वेस्थानकांवर सरकता जीना बसविण्यात येणार आहे.सोलापूर येथील सरकत्या जिन्याच्या विद्युतीकरणासाठी तब्बल 1 करोड 2 लाख रुपये मंजूर झाले आहेत. त्याच्या स्थापत्यकरणासाठी वेगळा खर्च होणार आहे. यांत्रिकी विभागाचा वेगळा खर्च होणार आहे.

 येत्या एक ते दोन दिवसांत लिफ्ट सुरू होण्याची शक्यता आहे. त्यानंतर ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला, लहान मुले यांना सोलापूर रेल्वेस्थानकावरील एका फलाटावरून दुसर्‍या फलाटावर जाण्यासाठी होणारी दमछाक थांबणार आहे. यामुळे प्रवाशांना काहीसा दिलासा मिळणार आहे.