होमपेज › Solapur › महाशिवरात्रीसह रमजानचे ‘रोजे’ करणारा नितीन 

महाशिवरात्रीसह रमजानचे ‘रोजे’ करणारा नितीन 

Published On: Jun 15 2018 10:35PM | Last Updated: Jun 15 2018 8:25PMसोलापूर : रामकृष्ण लांबतुरे  

हिंदू धर्मात महाशिवरात्रीचा उपवास जितका पुण्याचा समजला जातो, तितकाच मुस्लिम धर्मात रोजा करणारा पुण्यवान ठरतो. मात्र हे दोन्ही उपवास करत दोन्ही धर्माचे पुण्य कमविणारे क्वचितच दिसतात. त्यापैकीच एक म्हणजे सोलापूरातील हिरशेट्टी घराणे.

हिरशेट्टी या हिंदू धर्मीय परिवारात महाशिवरात्रीचा उपवास हा सारेजण भक्‍तिभावाने करतात. तसेच मुस्लिम धर्मीयांच्या रमजान महिन्यातील शेवटचे चार रोजे करण्याची परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून आबाधीत आहे. यंदा ही परंपरा या घराण्यातील नितीन हिरशेट्टी या तीस वर्षांच्या तरुणाने जोपासली  आहे. आज एकीकडे सोशल मीडियातून जातीयवादाची गरळ ओकली जात  असताना  दुसरीकडे याला बळी न पडणार्‍यांची संख्याही कमी नाही. या जातीयद्वेषाला छेद देवून सामाजिक सलोख्याची परंपरा हिरशेट्टी कुटुंब आबाधित ठेवत आहेत. कुटुंबात पहिल्यांदा ‘सतीश’ हा थोरला मुलगा रोजे ठेवत होता. मात्र त्यांच्या कामातील धावपळीमुळे यंदाच्या वर्षी रोजा ठेवणे कठीण होते. मात्र घराण्यातील ही परंपरा आबाधीत रहावी, यासाठी नितीन यांनी रोजा सुरू केला आहे. सात वर्षांपासून तो आता रोजे ठेवत आहे. नितीन म्हणतात की, हिंदू धर्मातील महाशिवरात्री, एकादशी, संकष्टी असे अनेक उपवास यापूर्वी केले होते. रोजा सलग ठेवावा लागत असल्यामुळे तो होईल की नाही याची मनात भीती होती. मात्र ईश्‍वर आणि अल्लाहवर श्रध्दा ठेवून रोजा सुरू केला आणि रोजा ठेवल्यानंतर ती पेलण्याची ताकद आपोआप आली. गेल्या सात वर्षांपासून रोजा ठेवताना सुरुवातीला त्रास झाला, पण आता श्रद्धेच्या जोरावर रोजा सहजपणे साध्य होतो. 

नितीनचे पणजोबा जन्मल्यानंतर सुरुवातीला ते आजारी होते. सोरेगाव येथील लालसाब पीरच्या नावाने लालप्पा नाव ठेवल्याने त्यांचा आजार दूर झाला, अशी त्याच्या कुटुंबातील अख्यायिका आहे. त्यामुळे लालसाब पीरवर त्यांची श्रध्दा निर्माण झाली आणि  घराण्यात रोजाची परंपरा सुरू झाली. विशेष म्हणजे ते राहत असलेल्या उत्तर सदर बझार येथील दाळ गल्लीत त्यांच्या शेजारी अनेक मुस्लिम कुटुंबीय राहतात. 

त्यामुळे रमजान महिन्यातील रोजाच्या सर्व विधी त्यांना आपसुकच कळाल्या. आता पुढे ही परंपरा आपला मुलगा करेल की  नाही हे माहिती नाही. मात्र आपण असेपर्यंत तरी ही परंपरा कायम  ठेवू असे, नितीन हिरशेट्टी यांनी ‘पुढारी’शी बोलताना सांगितले.