Tue, Jul 23, 2019 06:22होमपेज › Solapur › बेकायदा वाहनात गॅस भरताना दोन वाहने जळून खाक 

बेकायदा वाहनात गॅस भरताना दोन वाहने जळून खाक 

Published On: Dec 20 2017 6:37PM | Last Updated: Dec 20 2017 6:37PM

बुकमार्क करा

नातेपुते : वार्ताहर 

लोकवस्ती, रहदारी असलेला हम रस्ता व अगदी शेजारी मोबाईल टॉवरचा डिझेल साठा अशा ठिकाणी शिवसाई सर्व्हिस स्टेशन नावाने चालू असलेल्या बेकायदेशीर गॅस फिलींग सेंटर वर मारुती ओमणी गाडीत गॅस भरताना गाडीने पेट घेतला व यामध्ये शेजारी उभी असलेली दुसरी गाडी सुध्दा जळून खाक झाली. सुदैवाने सिलेंडरचा स्फोट न झाल्याने जीवीत हानी टळली. सदरची घटना नातेपुते शहरात दि. 18 डिसेंबर रोजी सकाळी घडली. 

पुणे पंढरपूर पालखी महामार्गा लगत सोनवणे शॉपिंग सेंटर मधील शेवटच्या गाळ्यात हा प्रकार घडला आहे. घटना स्थळाजवळच दोन मोबाईल टॉवर असून त्यामध्ये प्रत्येकी किमान दोनशे लिटर डिझेल साठा असल्याचे समजले. या टॉवर लगत दाट लोकवस्ती असून समोरच्या बाजूला दिडशे ते दोनशे फुटांवर वेळापूर येथील जामदार एच. पी. गॅस एजन्सीचा बेकायदेशीर गॅस टाक्यांचे गोडाऊन आहे व तेथून सुमारे दोनशे फुटांवर इंडियन ऑईल चा पेट्रोल पंप आहे. दुर्दैवाने गॅस टाकीचा स्फोट झाला असता तर किती भयानक घटना घडली असती याची यावरून कल्पना येऊ शकते.

 नातेपुते शहरात अशा प्रकारे बेकायदेशीर व्यवसाय करणा-या लोकांचे प्रमाण मोठे असून माळशिरस पुरवठा विभागाचे याकडे जानिवपुर्वक दुर्लक्ष असल्याचे बोलले जात आहे. सदर घटनेचा पंचनामा करण्यासाठी पुरवठा निरिक्षक आर. पी. पाटील यांनी केला असून, जामदार एच. पी. गॅस एजन्सीचे गोडाऊन मध्ये त्यांना भरलेल्या सिलिंडरचा साठाही  मिळून आला. या घटने संदर्भात त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, नातेपुते येथील नागरिकांचे नशीब चांगले म्हणून मोठी दुर्घटना टळली आहे. मी पंचनामा केला असून योग्य ती कायदेशीर कारवाई करणार आहे. 

या दुकानदाराला गॅसचा पुरवठा कोण करत होते? इतके दिवस त्याला कोणी पाठीशी घातले? जामदार एच पी गॅस एजन्सीचा बेकायदेशीर सिलेंडरचा साठा राजरोसपणे कोणाच्या अशिर्वादाने चालू आहे. हे प्रश्न नातेपुते येथील सुज्ञ नागरिक विचारत आहेत.