Tue, Nov 13, 2018 01:26



होमपेज › Solapur › मुस्लिम कुटुंबियांची मराठी, संस्कृत भाषेत लग्नपत्रिका

मुस्लिम कुटुंबियांची मराठी, संस्कृत भाषेत लग्नपत्रिका

Published On: Dec 27 2017 6:09PM | Last Updated: Dec 27 2017 6:09PM

बुकमार्क करा




सोलापूर : अमोल व्यवहारे

मुस्लिम समाजबांधवांच्या लग्नपत्रिका या साधारणतः देवनागरी लिपीमधल्या उर्दू भाषेत तथा फारसी लिपीतल्या उर्दू भाषेत छापली जातात. पण हसीब नदाफ आणि बदिउज्जमा बिराजदार यांनी आपल्या मुलांच्या लग्नाच्या पत्रिका अनुक्रमे उर्दू इंग्रजीसह, मराठी आणि संस्कृत भाषेत छापून महाराष्ट्रीयन संस्कृतीशी आपली नाळ घट्टपणे जोडली असल्याचे सिध्द करत एकात्मतेचा संदेश़ दिला आहे. 

हसीब नदाफ हे सोलापुरातील सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांचे वडील डॉ. अ.अजिज नदाफ हे विख्यात साहित्यिक व शाहीर आहेत. त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत शाहीर अमर शेख, शाहीर गव्हाणे यांच्यासोबत योगदान दिले आहे. मुस्लिम मराठी साहित्य सुरु करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. सुरुवातीपासून नदाफ परिवाराची मुस्लिम मराठी परिवार म्हणून ओळख आहे. त्यांचे मित्रदेखील समाजातील विविध जात वर्गातील आहेत. त्यांनी त्यांचे हे सामाजिक स्नेहबंध जपण्यासाठी हसीब नदाफ यांच्या मुलाची आणि मुलीची लग्नाची पत्रिका मराठीत छापली. 

तर बदिउज्जमा बिराजदार हे मुस्लिम मराठी साहित्यिक आहेत. एक गझलकार म्हणून ते महाराष्ट्रात परिचयाचे आहेत. त्यांचे वडील हे संस्कृत भाषेचे तज्ज्ञ होते. बदिउज्जमा बिराजदार यांचे सोलापूरच्या साहित्य वर्तुळात मोठे प्रस्थ आहे. त्यामुळेच त्यांनी उर्दू, इंग्रजी सोबत मराठी आणि संस्कृत भाषेत विवाहपत्रिका छापून राष्ट्रीय आणि भाषिक एकात्मतेचा संदेश दिला आहे.