Sun, Jul 21, 2019 05:37होमपेज › Solapur › सोलापूर-मुर्शियामध्ये झाला सामंजस्य करार 

सोलापूर-मुर्शियामध्ये झाला सामंजस्य करार 

Published On: May 25 2018 1:21AM | Last Updated: May 25 2018 1:21AMसोलापूर : प्रतिनिधी

औद्योगिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आदींबाबत देवाण-घेवाण करण्याच्यादृष्टीने केंद्र शासनाच्या शाश्‍वत शहरी विकास योजनेंतर्गत सोलापूर महापालिका आणि स्पेनमधील मुर्शिया या शहरादरम्यान आज गुरुवारी  सामंजस्य करार झाला.  

महापालिकेच्या जुन्या सभागृहात यासंदर्भात आज कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी महापौर शोभा बनशेट्टी, आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे, युरोपियन युनियनच्या इंटरनॅशनल अर्बन कॉर्पोेरेशनचे संचालक पिअर रॉबर्टो रिमिटी आणि आशिष वर्मा यांनी करारावर स्वाक्षर्‍या केल्या. युुरोपियन युनियनने आशिया आणि उत्तर-दक्षिण अमेरिकेतील शहरे आणि भागीदार शहरातील शाश्‍वत शहरी विकासावर सहकार्य वाढविण्यासाठी आंतरराष्ट्रीय शहरी सहकारिता कार्यक्रम विकसित केला आहे. या करारांतर्गत स्थानिक नेत्यांना विकास समस्यांना हाताळण्यावर नवीन दृष्टिकोन ठेवून संपर्क साधता येणार आहे. आंतरराष्ट्रीय शहरी सहकार्य कार्यक्रमांतर्गत शहरांच्या जोडीला पुढाकार घेण्यासाठी मलेशियातील क्वालालंपूरमधील फोरममध्ये सुरुवात करण्यात आली आहे. त्याचे समर्थन करण्यासाठी भारत कार्यक्रम आणि महापालिका यांच्यात भागीदारी करार झाला.

एक करार झाल्यावर भारतातील बारा शहरे युरोपियन युनियनमधील 12 शहरांशी जोडण्याची प्रक्रिया सुरु होईल. जी शहरे स्थानिक कृती आराखड्याच्या विकासासाठी समान शहरीकरण आव्हानांचा सामना करण्यासाठी सहकार्य करेल. ही योजना दोन वर्षांपर्यंत सुरु राहणार आहे. शहराच्या विकासासाठी तांत्रिक व सहाय्यभूत आधार आदानप्रदान केले जाणार आहेत. अभ्यासदौरा, ज्यामध्ये पाच राजकीय आणि तांत्रिक प्रतिनिधींचा समावेश असणार आहे. महापालिका कर्मचार्‍यांच्या विशिष्ट गरजा, विनंती आणि ओळखीसाठी सेवांची देवाणघेवाण केली जाईल. हवा, पाणी, ध्वनीप्रदूषण, सांडपाणी, ऊर्जा व्यवस्थापन आणि कार्यक्षमता,  ऐतिहासिक वारसाक्षेत्र, शैक्षणिक क्षेत्रातील आव्हानांचा सामना करण्यासाठी उपाययोजना आदींबाबत हा करार आहे.