Mon, May 20, 2019 22:04होमपेज › Solapur › सोलापूर : अडीच वर्षांपूर्वीच्या खुनाचा गुन्हा; वकिलास कोठडी

सोलापूर : अडीच वर्षांपूर्वीच्या खुनाचा गुन्हा; वकिलास कोठडी

Published On: Feb 19 2018 10:54PM | Last Updated: Feb 19 2018 10:53PMसोलापूर : प्रतिनिधी

प्रेमसंबंधातून  पळून गेलेल्या मावस बहिणीच्या खून प्रकरणात जोडभावी पेठ पोलिसांनी एका वकिलास अटक करून पोलिस कोठडी घेतली आहे.  सुमारे  अडीच  वर्षांपूर्वी   झालेल्या या ऑनर किलिंगच्या  घटनेला निनावी पत्रामुळे वाचा फुटून याबाबत जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात  गुन्हा  दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी एका बडतर्फ पोलिस कर्मचार्‍यासह सहा जणांना यापूर्वीच अटकपूर्व जामीन मिळालेला आहे.

अ‍ॅड. रविदास दिनकर सरवदे (वय 31, रा. मड्डी वस्ती, भवानी पेठ, सोलापूर) असे पोलिस कोठडी मिळालेल्या वकिलाचे नाव आहे. याबाबत पांडुरंग विठ्ठल भोसले (वय 45, रा. सरवदेनगर) यांनी दिलेल्या  फिर्यादीवरून युवराज सरवदे, विनोद  सरवदे, किशोर  सरवदे, अनिल सरवदे, प्रभाकर भोसले (रा. जोशी गल्ली), विष्णू भोसले (रा. मड्डी वस्ती, सोलापूर) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अ‍ॅड. सरवदे यांचा सहभाग निष्पन्न झाल्याने अ‍ॅड. सरवदे  यांना  जोडभावी पेठ पोलिसांनी  त्यास  अटक करून सोमवारी न्यायदंडाधिकारी देवकाते यांच्यासमोर हजर  केले  होते. त्यांना पोलिस कोठडी देण्यात आली आहे. राजश्री भोसले (वय 21, रा. जोशी गल्ली, सोलापूर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

राजश्री भोसले ही महिला ईश्‍वर भोसले याच्याबरोबर प्रेमसंबंधातून 2016 मध्ये  पळून गेली होती. त्यानंतर राजश्री हिला तिच्या नातेवाईकांनी शोधून  मुंबई येथून परत आणले. त्यानंतर काही दिवसानंतर राजश्री हिचा विष्णू भोसले याच्या घरात संशयास्पदरित्या मृत्यू झाला. राजश्री हिचा मृत्यू झाला नसून खून  करण्यात आल्याबाबत निनावी पत्र पोलिस आयुक्‍तांना पाठविण्यात आले होते. त्या पत्राची चौकशी करून अखेर 2 जुलै 2016 रोजी जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात युवराज सरवदे, विनोद  सरवदे, किशोर  सरवदे, अनिल सरवदे, प्रभाकर भोसले, विष्णू भोसले यांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन दिला आहे.

अ‍ॅड. सरवदे  हे  राजश्रीचे मावस   भाऊ  असून  त्यांनी   महापालिकेतून  राजश्रीचा  मृत्यू दाखला मिळविल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले  आहे.  सहायक पोलिस निरीक्षक बी. एच. पाटील तपास करीत आहेत.याप्रकरणी सरकारच्यावतीने अ‍ॅड. विद्या बनसोडे यांनी काम पाहिले.