Mon, May 27, 2019 00:40होमपेज › Solapur › सोलापूरचे ‘परिवहन’ मृत्यूशय्येवर

सोलापूरचे ‘परिवहन’ मृत्यूशय्येवर

Published On: Apr 09 2018 10:57PM | Last Updated: Apr 09 2018 10:51PMसोलापूर ः प्रतिनिधी

आर्थिक डबझाईत असलेल्या  महापालिका परिवहन उपक्रमाच्या कर्मचार्‍यांनी 9 महिन्यांच्या थकीत पगारासाठी सोमवारपासून बेमुदत आंदोलनास सुरुवात केली. दररोज तीन लाख रुपये नुकसानीत चाललेला हा उपक्रम मृत्यूशय्येवर असून सक्षम पर्याय न निवडल्यास अखेरचा घटका मोजण्याची चिन्हे आहेत.

परिवहन उपक्रम हे महापालिकेचे एक अंग आहे, पण नियोजनशून्य कारभारामुळे गेल्या अनेक वर्षांपासून हा उपक्रम तोट्यात आहे. एकेकाळी आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या या उपक्रमाकडून गरज भासल्यास मनपाला आर्थिक मदत दिली जायची, पण सध्या मनपाच आर्थिकदृष्ट्या अडचणीत असल्याने या उपक्रमाला वाली नाही, अशी स्थिती गेली अनेक वर्षे कायम आहे. जेएनएनआरयुएम योजनेतून या उपक्रमाला सुमारे 150 बसेस मिळाल्या होत्या. यापैकी 100 जनबस चेसी क्रॅक झाल्याने भंगारात काढण्यात आल्या आहेत. सध्या केवळ 35 बसेस धावत आहेत. दैनंदिन खर्च साडेचार लाखांचा, तर उत्पन्न दीड लाख इतके आहे. म्हणजे दररोज तीन लाखांचा तोटा उपक्रमाला होत आहे. कायम कर्मचार्‍यांची संख्या साडेचारशे इतकी आहे. गेल्या 9 महिन्यांपासून त्यांचा पगार प्रलंबित आहे. सध्या धावणार्‍या 35 बसेसचा विचार करता बहुतांश कर्मचारी हे बसून आहेत. 

सक्षम पर्यायाची गरज 

गेल्या 9 महिन्यांपासून पगार न झाल्याने मेटाकुटीला आलेल्या कर्मचार्‍यांनी सोमवारपासून लाल बावटा कामगार युुनियनच्या नेतृत्वाखाली बेमुदत आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. प्रचंड तोट्यात हा उपक्रम असल्याने उपक्रम चालविणे अवघड बनले आहे. हा उपक्रम व्यवस्थित चालविण्यासाठी सक्षम पर्याय निवडण्याची गरज निर्माण झाली आहे. परिवहनच्या बजेटमध्ये अनुदान घेऊन हा उपक्रम चालवावा किंवा एस.टी.कडे वर्ग करण्याची शिफारस प्रशासनाने केली आहे. यावर सर्वसाधारण सभा काय निर्णय घेणार याची उत्सुकता आहे. परिवहनच्या  समस्येवर आजवर केवळ तात्पुरत्या मलमपट्टीच्या उपायाचा अवलंब करण्यात आला. मृत्यूशय्येवर असलेल्या या उपक्रमाबाबत कायमस्वरुपी उपाययोजना केल्यासच हा उपक्रम चालणार अथवा नाही, अशी स्थिती आहे.  

प्रवाशांची होणार लूट 

दरम्यान, बंदमुळे शहराची दळणवळण सेवा विस्कळीत झाली आहे. विद्यार्थ्यांबरोबरच परगावहून येणार्‍यांचे यामुळे हाल होणार आहेत. रिक्षा तसेच अवैध प्रवासी वाहनधारकांकडून प्रवाशांची लूट होणार आहे. 

Tags : solapur, solapur news, smt