Mon, Mar 25, 2019 17:36होमपेज › Solapur › मनपा प्रभारी सभागृहनेत्याचे नाव अजूनही गुलदस्त्यातच

मनपा प्रभारी सभागृहनेत्याचे नाव अजूनही गुलदस्त्यातच

Published On: Jan 19 2018 7:55AM | Last Updated: Jan 19 2018 7:55AMसोलापूर ः प्रतिनिधी

पालकमंत्री व सहकारमंत्री या दोन गटांच्या मनोमिलनानंतर मनपा सभागृहनेत्याचे नाव निश्‍चित करण्यात अडचण नसल्याचे चित्र असताना अजूनही हे नाव न ठरल्याने दोन गटांत धूसफूस कायम असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शुक्रवारी मनपाची सर्वसाधारण सभा होणार असल्याने हे पद कोणाकडे जाणार याविषयी प्रचंड उत्सुकता आहे.

गत आठवड्यात मुख्यमंत्र्यांनी सोलापूर मनपातील दोन गटांमधील वादावर पडदा टाकला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्याच सूचनेनुसार पालकमंत्र्यांनी शनिवारी स्नेहभोजन आयोजित करुन दोन्ही गटांना एकत्र आणले होते. दोन मंत्री, शहराध्यक्ष व मनपाच्या पदाधिकार्‍यांनी एकत्र बसून मनपा सभागृहनेता निवडणे अपेक्षित असताना तसे कुठलेही प्रयत्न न झाल्याने हा विषय पुन्हा प्रदेश भाजपकडे गेला आहे. प्रदेशकडून बंद लखोट्यात हे नाव निश्‍चित करुन पाठविण्यात येईल, असे ठरल्याचे वृत्त आहे. हा लखोटा आणण्यासाठी उपमहापौर शशिकला बत्तुल या गुरुवारी मुंबईत होत्या. मात्र सायंकाळपर्यंत कुठल्या नावाची निश्‍चिती झाली, हे समजू शकले नाही.

दुसरीकडे हे पद बीपीएमसी अ‍ॅक्टमधील तरतुदीनुसार स्थायी समितीच्या सभापतीकडे जाईल, अशी चर्चा आहे. सभागृहनेत्याच्या गैरहजेरीत हे काम स्थायी समितीच्या सभापतींनी पाहावे, अशी तरतूद असल्याचे सांगण्यात येते. सभागृहनेते सुरेश पाटील यांनी स्थायी समितीचे सभापती संजय कोळी यांच्या नावाची शिफारस केल्याची चर्चा मनपा वर्तुळात रंगली होती. मात्र यासंदर्भात अधिकृतपणे कोणीही दुजोरा दिला नाही. मनपाची जानेवारी महिन्याची सभा शुक्रवारी सकाळी 11 वाजता होणार आहे. त्यामुळे  प्रदेशकडून  प्रभारी सभागृहनेतेपदाचे नाव घोषित केले जाईल, अशी माहिती आहे.