Thu, Jun 27, 2019 18:23होमपेज › Solapur › सोलापूर : व्यापार्‍यांचे लाड बंद करा(Video)

सोलापूर : व्यापार्‍यांचे लाड बंद करा(Video)

Published On: Jul 12 2018 1:44AM | Last Updated: Jul 12 2018 1:44AMसोलापूर : प्रतिनिधी

व्यापार्‍यांनी सुरुवातीला जकातीला विरोध  केला म्हणून सरकारने जकात बंद करून एलबीटी सुरु केली. व्यापार्‍यांनी एलबीटीलाही विरोध केला म्हणून जीएसटी लागू झाला, तर त्यालाही या व्यापार्‍यांचा विरोधच. लाखमोलाचे गाळे पाचशे-सातशे रुपये भाड्याने  वर्षानुवर्षे वापरतात, वरून महापालिका सोयी पुरवत नाही म्हणून दुषणे देणार्‍या  स्वार्थी व्यापार्‍यांचे लाड बंद करा आणि कायद्यानुसार ई-टेंडर पध्दतीनेच गाळे भाड्याने द्या, अशी मागणी महापालिका कामगार कृती समितीच्या निदर्शन आंदोलनात अशोक जानराव यांनी केली.

महापालिकेच्या मालकीचे भाडे मुदत संपल्यावरही न सोडता ते त्यांच्याच नावे हस्तांतरित करा, त्याचा ई-टेंडर पध्दतीने भाडेकरार करू नका या मागणीसाठी गाळेधारकांनी आंदोलन सुरु केले. त्याची दखल घेत सहकारमंत्री आणि महापौरांनी त्यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा आयोजित केल्याच्या निषेधार्थ आणि गाळे ई-टेंडरिंगच्या समर्थनात महापालिकेच्या बारा संघटनांच्या कृती समितीने  निदर्शने केली.

यावेळी कृती समितीचे अशोक जानराव यांनी व्यापार्‍यांबरोबर व्यापार्‍यांना समर्थन देणारे नगरसेवक आणि चर्चेसाठी बोलाविणार्‍या सरकारवरही कडाडून टीका केली.  सोलापूर महापालिका ही राज्यात चौथ्या क्रमांकाची होती. ती घसरुन  खालून चौथ्या क्रमांकावर आली आहे. याला कारण म्हणजे हे व्यापारी आहेत. या भांडवलदार व्यापार्‍यांनी महापालिकेला ओरबडून खाण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यांना साथ देण्याचा प्रयत्न करत असलेल्या नगरसेवक आणि राजकीय पक्षांनाही येत्या निवडणुकीत त्यांची जागा दाखविण्याचे काम हे कर्मचारी आणि सोलापूरकर करतील.

यावेळी कार्याध्यक्ष डी. एस. म्हेत्रे, कार्याध्यक्ष अजय क्षीरसागर, सरचिटणीस प्रदीप जोशी, सूर्यकांत भोसले, जनार्दन शिंदे, चांगदेव सोनवणे, बाबासाहेब क्षीरसागर, बाली मंडेपू, नागनाथ गदवालकर, शशीकांत शिरसट, तेजस्विता कासार, जाधव, सारिका आकुलवार, मोहन कांबळे, दीपक दोड्यानूर, भालचंद्र साखरे  उपस्थित होते .

आडम मास्तरांच्या भूमिकेवर आश्‍चर्य 
ज्यांनी कामगार आणि श्रमिकांचे नेतृत्व उभी हयात केले ते माजी आमदार आडम मास्तर यांनीसुध्दा या भांडवलदारांच्या बाजूने आंदोलनात उतरावे यामुळे आम्हाला आर्श्‍चयाचा धक्का बसला आहे. महापालिकेतील कर्मचार्‍यांना त्यांचा पगार मिळत नाही, त्यांची देणी वेळेवर दिली जात नाहीत, तब्बल 250 कोटींची देणी महापालिकेकडे थकीत आहेत, तर त्याची बाजू घेण्याऐवजी मास्तरांनी धनदांडग्यांची बाजू घेण्याचे गौडबंगाल काय, अशी बोचरी टीका अशोक जानराव यांनी केली.