Sat, Apr 20, 2019 16:37होमपेज › Solapur › गाळ्यांच्या जाळ्यात मालकांची कोंडी

गाळ्यांच्या जाळ्यात मालकांची कोंडी

Published On: Jul 16 2018 1:20AM | Last Updated: Jul 15 2018 10:22PMसोलापूर : दीपक होमकर

सोलापूर  शहरात  पालकमंत्री देशमुख विरुद्ध सहकारमंत्री देशमुख वाद हे राज्यभरासाठी उघड गुपीत आहे. नुकत्याच झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत सुभाष देशमुखांच्या पॅनेलविरुद्ध थेट काँग्रेसशी हातमिळवणी करणार्‍या पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना त्यांच्या शहर उत्तर मतदारसंघातूनच शह देण्यास सुभाषबापूंनी सुरुवात केली आहे. त्याला निमित्त मिळाले आहे ते सोलापूर महापालिकेच्या गाळेधारक व्यापार्‍यांच्या सुरू झालेल्या आंदोलनाचे.

महापालिकेने भाड्याने दिलेले लाखमोलाचे बहुतांशी गाळे शहर उत्तर मतदारसंघात आहेत. त्यामुळे आयुक्तांनी जेव्हा गाळ्यांबाबत ई-टेंडर प्रक्रिया सुरु केली, तेव्हा व्यापार्‍यांनी सर्वप्रथम पालकमंत्र्यांकडे मदत मागितली. मात्र ‘कायद्याने माझे हात बांधले आहेत’ असे अनपेक्षित उत्तर पालकमंत्र्यांकडून आल्यावर लागलीच त्यांना ‘उत्तर’ म्हणून बहुजन समाज पक्षाचे महापालिकेतील गटनेते आनंद चंदनशिवे यांनी पालकमंत्र्यांच्या विरोधात व्यापार्‍यांची मोट बांधली, त्याला बळ यावे, यासाठी आंदोलनाचा गाढा अनुभव असणार्‍या माजी आमदार आडम मास्तर यांच्याकडे थेट नेतृत्व सोपविले. 

त्यामुळे व्यापार्‍यांच्या माध्यमातून आनंद चंदनशिवे यांनी व्यापार्‍यांच्या खांद्यावर बंदूक ठेवत आयुक्तांसह थेट पालकमंत्र्यांवर निशाणा साधला. पालकमंत्री विजयकुमार देशमुखांविरोधात त्यांच्याच विधानसभा मतदारसंघात गढूळ झालेल्या या वातावरणाचा फायदा घेणार नाहीत ते सहकारमंत्री कसले!, गाळेधारकांच्या मोर्चाच्या आदल्या दिवशीच सहकारमंत्र्यांनी निरोप पाठवून मुख्यमंत्र्यांची भेट घालून हा प्रश्‍न सोडविण्याचे आश्‍वासन दिले. तरीदेखील व्यापार्‍यांनी मोर्चा काढलाच. एरव्ही मोर्चाच्या मंचावर महापौर  जात नसल्या तरी व्यापार्‍यांच्या या मोर्चामध्ये थेट त्यांच्या मंचावर जाऊन त्यांनी सहकारमंत्र्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना भेटून प्रश्‍न सोडवू, असे आश्‍वासन देत शेकडो व्यापार्‍यांसमोर पालकमंत्र्यांचे हात बांधलेले असले तरी सहकारमंत्रीच हा प्रश्‍न सोडविण्यासाठी हातपाय हलविणार असल्याचे सूतोवाच केले. 

मुख्यमंत्र्यांच्या निमंत्रणाचे लेखी पत्र आलेच नाही, तरी सहकारमंत्र्यांनी पावसाळी अधिवेशनामुळे मुख्यमंत्र्यांचा नागपुरातील मुक्कामाचे गणित ओळखून व्यापार्‍यांना नागपुरात बोलावून घेतले आणि व्यापार्‍यांना दिलासा देणारा निर्णय मुख्यमंत्र्यांना घ्यायला लावला. पालकमंत्र्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्याच मतदारसंघातील या प्रश्‍नावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली. त्यामुळे विधानसभेला पालकंमत्र्यांच्या विरोधात दंड थोपटू पाहणार्‍या आनंद चंदनशिवे यांची सहकारमंत्र्यांनीच पाठ थोपटल्याचा फोटोही व्हायरल करण्यात आला.  एकूणच बाजार समितीमध्ये सहकारमंत्र्याच्या पॅनलला विरोध करून त्यांना पराभव चाखायला लावणार्‍या पालकमंत्र्यांना आता त्यांच्या घरात (शहर उत्तर विधानसभा मतदरासंघ) जाऊन शह देण्याची खेळी सहकारमंत्र्यांनी खेळली आहे. महापालिकेच्या माध्यमातून कार्यसम्राट अशी ओळख निर्माण केलेले  आनंद चंदनशिवे यांना त्यांनी मोहरा बनविला आहे.