Sun, May 26, 2019 00:38होमपेज › Solapur › प्‍लास्‍टिक बंदी अंमलबजावणीसाठी सोलापूर महापालिका सज्‍ज

प्‍लास्‍टिक बंदी अंमलबजावणीसाठी सोलापूर महापालिका सज्‍ज

Published On: Jun 23 2018 1:23AM | Last Updated: Jun 23 2018 1:23AMसोलापूर ः प्रतिनिधी 

सोलापूर शहरात पर्यावरण र्‍हासास कारणीभूत ठरणार्‍या प्लास्टिक आणि थर्मोकोल बंदी कायद्याच्या कडक अंमलबाजवणीसाठी शनिवारपासून विशेष अभियान सुरू करण्यात येत आहे. त्याअंतर्गत प्लास्टिक व थर्मोकोल वापरणार्‍यांच्या शोधासाठी महापालिकेने तब्बल 10 पथके आणि 78 अधिकार्‍यांची नेमणूक केली असून संबंधितांकडून पाच हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात येणार आहे. त्यामुळे महापालिकेने प्लास्टिकविरोधात जोरदार सर्जरीच हाती घेण्यात आली आहे. 

प्लास्टिकविरोधी पथकाद्वारे शनिवारपासून हॉटेल, दुकाने, कारखाने, हातगाडी व्यावसायिक आदी ठिकाणी जाऊन बंदी घालण्यात आलेले प्लास्टिक आढळल्यास त्यांना पाच हजार रुपयांचा दंड लावण्यात येणार आहे. शिवाय प्लास्टिक आणि थर्मोकोलची  विक्री करणार्‍या दुकानात जाऊनही तेथे जर बंदी असलेले प्लास्टिक विक्री करताना आढळल्यास तेथील सर्व प्लास्टिक वस्तू पिशव्या, ताट, वाटी, वेस्टन आदी जप्त करून त्याचा पंचनामा करून दंडाबरोबरच दुकान सील करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. 

नेमक्या कोणत्या प्लॅस्टिकवर बंदी आहे व कारवाई कशी करावी याबाबत अधिकार्‍यांना प्रशिक्षणही देण्यात आलेले आहे.  यावेळी राज्य प्रदूषण महामंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी एस. एन. अवताडे, उपायुक्त त्र्यंबक डेंगळे-पाटील उपस्थित होते.

अशी असेल समिती

महापालिकेच्या आठ  विभागीय कार्यालयांमध्ये विभागीय अधिकार्‍यांच्या नियंत्रणाखाली मुख्य आरोग्य निरीक्षक व आरोग्य निरीक्षक यांचे पथक, शिवाय मंडई विभाग व अन्न परवाना विभाग यांचे दोन पथक, अशी आठ पथके व 78 अधिकारी असणार आहेत.

अशी होईल कारवाई

बंदी घालण्यात आलेल्या प्लॅस्टिकची साठवणूक, वितरण, विक्री, हाताळणी, वाहतूक व आयात करताना आढळल्यास त्यांना पहिल्या वेळी पाच हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. त्यानंतरही पुन्हा दुसर्‍यांदा आढळल्यास दहा हजार रुपये आणि तिसर्‍या वेळेस 25 हजार रुपये दंड आणि पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.