Tue, Nov 20, 2018 23:18होमपेज › Solapur › आषाढीच्या तोंडावर पालिका प्रशासन सुस्त

आषाढीच्या तोंडावर पालिका प्रशासन सुस्त

Published On: Jul 18 2018 1:55AM | Last Updated: Jul 17 2018 10:25PMपंढरपूर : प्रतिनिधी

आषाढी यात्रा अगदी पाच ते सहा दिवसांवर आली असताना येथील चंद्रभागा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. या नदीपात्रात जनावरे धुतात, गटरीचे पाणी चंद्रभागेत जात आहे. या घाण पाण्यामध्येच पवित्र स्नान करून भाविकांना समाधान मानावे लागत असताना पालिका प्रशासन मात्र आषाढी वारीच्या तोंडावर  सुस्त झाले आहे.

आषाढी वारीसाठी पंढरीत भाविकांची संख्या वाढू लागली आहे. यात्रा अवघ्या सहा दिवसांवर आली आहे. राज्याच्या विविध भागांतून रेल्वे, एसटी व खाजगी वाहनांनी येथे भाविक दाखल होत आहेत. सध्या भाविकांना चंद्रभागेत पवित्र स्नान करताना या घाणीचा सामना करावा लागत आहे. शहरातील 42 ठिकाणी 1200 तात्पुरते शौचालय बसवण्यात आले आहेत.  पंरतु त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नसल्याने त्याचा काहीच उपयोग होत नाही. नदी पात्रात 54 ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. परंतु पाणी येत नाही, वीज पुरवठा सुरू नाही. तात्पुरते 1100 सफाई कर्मचारी घेण्यात आले आहेत. परंतु शहरात स्वच्छता ही दिसत नाही,.पत्राशेड येथे विशेष नेमणूक केलेले कर्मचारी तेथे दिसत नाहीत. ऐवढी मोठी यंत्रणा असून देखील पालिका प्रशासन आषाढी यात्रेच्या तोंडावर  सुस्त झाले आहे. निदान यात्रेअगोदर तरी चंद्रभागा वाळवंट तसेच पत्राशेड आणि शहरातील प्रदक्षिणा मार्गाची स्वच्छता होणे अपेक्षित असल्याची भावना यात्रेकरू करत आहेत. येथील पालिकेने जादा कर्मचारी लावून स्वच्छता करावी अशी मागणी भाविकांमधून व्यक्त होत आहे.

शहरातील धोकादायक इमारती असून त्या पाडण्यासाठी घर मालकांना फक्त नोटीसा दिल्या जातात. परंतु प्रत्येक्षात कारवाई होत नाही. मागील यात्रेत भिंत पडून एका भाविकाचा मृत्यू झाला होता. अशा दुर्घटना घडू नये यांची दखल पालिका घेताना दिसत नाही.