Fri, Nov 16, 2018 05:12होमपेज › Solapur › स्वाईन फ्लू, डेंग्यू उपाययोजनांच्या बोजवार्‍यावर सभेत फक्त चर्चा

स्वाईन फ्लू, डेंग्यू उपाययोजनांच्या बोजवार्‍यावर सभेत फक्त चर्चा

Published On: Sep 18 2018 5:41PM | Last Updated: Sep 18 2018 5:41PMसोलापूर : प्रतिनिधी

शहरात स्वाईन फ्लू, डेंग्यू, हिवताप आदीसह विविध साथरोगांचा फै लाव होत असल्याने मंगळवारच्या पालिका सर्वसाधारण सभेत सर्वच पक्षाच्या गटनेते, नगरसेवकांनी आरोग्य अधिकार्‍यांसह प्रशासनाला धारेवर धरुन प्रश्‍नांची सरबत्ती करताना आगपाखड केली. सभागृहात चुकीची व खोटी आकडेवारी देणार्‍या आरोग्य अधिकार्‍यांवर कारवाईची मागणी करतानाच या रोगांवर प्रतिबंधांसाठीच्या उपाययोजनांचा पुरता बोजवारा उडाल्याचे सभागृहात निदर्शनास आणले खरे, परंतु या गंभीर आजाराच्या प्रतिबंधासाठी भविष्यात नागरिकांसह सर्वांनी मिळून नियोजन करण्याच्या गुळमुळीत उत्तरावर आक्रमक झालेल्या नगरसेवकांनी समाधान मानले.

मंगळवार, १८ सप्टेंबर रोजी महापालिकेची सर्वसाधारण सभा महापौर शोभा बनशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली सुरु झाली. सभेचे कामकाज सुरु होण्यापूर्वीच नगरसेवकांनी स्वाईन फ्लू, डेंग्यूसह साथरोगांवर उपाययोजना करावी, या आजारा मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत द्यावी, जुळे सोलापुरात कचरा डंपींग होवू नये, काँग्रेसचे कौतुक करणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत यांच्या अभिनंदनाचा काँग्रेसने मांडलेला प्रस्ताव, अहमदनगर येथे बालिकेवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ सभा तहकूब करावी, असा सेनेचे विरोधी पक्षनेते महेश कोठे यांचा प्रस्ताव सभेपुढे सादर केले.

शहरात स्वाईन फ्लू, डेंग्यू, हिवताप आदीसह विविध साथरोगांचा फैलाव होत असतानाही पालिकेचे आरोग्य खाते ढिम्म असल्याचा आरोप करीत काँग्रेस गटनेते चेतन नरोटे, बसपा गटेनेते आनंद चंदनशिवे, राष्ट्रवादीच गटनेते किसन जाधव, एमआयएमचे गटनेते तौफिक शेख, भाजपचे पक्षनेते संजय कोळी, विरोधी पक्षनेता महेश कोठे, नगरसेवक प्रभाकर जामगुंडे, विनायक विटकर, यु.एन. बेरिया, बाबा मिस्त्री, गुरुशांत धुत्तुरगावकर,  अमोल शिंदे, गणेश पुजारी, संगीता जाधव, अझहर हुंडेकरी, राजकुमार हंचाटे, संतोष भोसले, फिरदोस पटेल, सुनिता काटकर आदी नगरसेवकांनी आरोग्य अधिकारी यांना धारेवर घरले. आरोग्य अधिकारी सभागृहात चुकीची व खोटी आकडेवारी देत असल्याचा आरोपही केला. हद्दवाढ भागासह शहरात अनेक ठिकाणी उघड्या गटारी, मैलामिश्रीत पाणी, सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था, पाण्याची डबकी, मोकाट जनावरे व कुत्रे आणि डुकरांचा सुळसुळाट झाल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. आक्रमक झालेल्या नगरसेवकांनी आरोग्य अधिकार्‍यांसह आयुक्तांवरही प्रश्‍नांची सरबत्ती केली.

पालिका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांनी अश्‍विनी रुग्णालयातील रुणांची आकडेवारी सांगितली. पालिकेच्या आयडीएच मधील उपाययोजना सांगितल्या. परंतु नरसेवकांनी त्यांना धारेवर धरताना हे आजार फैलू नयेत यासाठी करावयाच्या उपाययोजनांमध्ये महापालिका कमी पडत असल्याचे नगरसेवकांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.

अखेरीस महापौरांच्या सूचनेवरुन पालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी सभागृहात सांगितले की, सर्व सदस्यांनी केलेल्या सूचनांची दखल घेतली जाईल. सदस्यांच्या संवेदनाप्रमाणेच प्रशासनाच्याही संवेदना आहेत. शहराचे आरोग्य चांगले रहावे ही पालिकेचे मुख्य काम आहे. आता १४६ घंटागाड्यांद्वारे घरोघरी जावून कचरा उचलण्याचे काम सुरु आहे. नागरिकांनी रस्त्यावर कचरा टाकू नये. मोकाट जनावरे, कुत्रे, गाढवे, डुकरांचा प्रश्‍न गंभीर आहे. कचरा रस्त्यावर न टाकल्याने आरोग्याचे अनेक प्रश्‍न सुटणार आहेत लवकरच प्रत्येक वॉर्डात स्वच्छता रॅली काढून जनजागृती केली जाईल. संसर्गजन्य रोगांचा सर्व्हे करुन उपाययोजना केल्या जातील. पाणीसाठा करताना काळजी घ्यावी व झाकून ठेवावा. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे.

काँग्रेसकडून सरसंघचालक मोहन भागवत यांचे अभिनंदन

राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे मोहन भागवत यांनी काँग्रेसचे जाहीररित्या कौतुक केल्याबद्दल काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे यांनी भागवतांच्या अभिनंदनाचा ठराव पालिकेच्या सर्वसाधारण सभेत मांडला. काँग्रेसने काहीच केले नाही असे भाजपवाले वारंवार म्हणतात, परंतु भागवतांनी काँग्रेसचे कार्य मोठे असल्याचे मान्य केले. त्यामुळे काँग्रेस त्यांचे अभिनंदन करीत आहे. यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक नगरसेवक श्रीनिवास रिकमल्ले यांनी भागवतांचे अभिनंदन केल्याबद्दल काँग्रेसचे आभार मानले.