Sun, Aug 25, 2019 07:57होमपेज › Solapur › मनपाची गाडी ‘हद्द’ ओलांडते तेव्हा...!

मनपाची गाडी ‘हद्द’ ओलांडते तेव्हा...!

Published On: Mar 17 2018 11:28PM | Last Updated: Mar 17 2018 11:02PMसोलापूर : प्रतिनिधी

महापालिकेच्या भ्रष्ट कारभाराचा आणखीन एक नमुना शनिवारी पाहावयास मिळाला. ड्रेनेजची सेफ्टी टँक साफ करणारी महानगरपालिकेची आरोग्य विभागाची गाडी चक्क मोहोळमध्ये आपली ‘सेवा’ बजावित असल्याचे मनपा सभागृहनेते संजय कोळी यांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

 मनपा सभागृहनेते  संजय कोळी हे नगरसेवक अविनाश पाटील, कैय्यावाले यांच्यासमवेत शनिवारी मोटारीने काही कामानिमित्त मोहोळमार्गे परगावी निघाले होते. मोहोळ येथे सकाळी सात वाजता मनपाच्या आरोग्य विभागाची गाडी त्यांच्या नजरेस पडली. मनपाची गाडी मोहोळमध्ये कशी काय? असा सवाल कोळी यांना पडला. त्यांनी लगेचच आपली गाडी थांबवून या प्रकरणाची माहिती घेतली. ड्रेनेज साफ करणारी गाडी (एमएच 13 एएक्स 2391) ही मनपाचीच असल्याची खात्री करुन घेतली. ड्रेनेज गाडीवरील दोन कर्मचार्‍यांची त्यांनी चौकशी केली़  महापालिका हद्द सोडून ही गाडी ग्रामीण भागातील मोहोळ येथे कशी आली अशी विचारणा केल्यावर 15 हजार रूपये घेऊन मोहोळ येथील ड्रेनेज सफाईचे काम करण्यात येत असल्याचे कर्मचार्‍यांनी सांगितले़ हा गैरप्रकार असल्याचे लक्षात येताच  सभागृहनेते संजय कोळी यांनी ही माहिती थेट आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांना दिली़ आयुक्तांनी या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश उपायुक्त त्रिंबक ढेंगळे-पाटील यांना दिले़  सोलापूर शहरातील हद्दवाढ विभागात ड्रेनेज नसल्याने सेफ्टी टँकची समस्या गंभीर आहे़  सेफ्टी टँक भरल्याने ड्रेनेज तुंबते. याची सफाई करण्यासाठी या गाडीचा उपयोग होतो़  अनेक नागरिक रितसर पैसे भरुन या गाडीच्या प्रतीक्षेत असतात, पण त्यांना वेळेवर सेवा दिली जात नाही़  जादा पैसे घेऊन ग्रामीण भागात ही गाडी घेऊन जाण्याचा हा प्रकार गंभीर असल्याची तक्रार सभागृहनेते संजय कोळी यांनी केली. 

महापालिकेत गैरप्रकार घडणे ही नित्याचीच बाब आहे. विद्यमान आयुक्त सध्या कर्तव्यकठोरपणे काम करीत आहेत. कर्तव्यात कसूर करणार्‍यांवर त्यांचे बडगा उचलण्याचे धोरण आहे. भ्रष्ट कर्मचार्‍यांनादेखील त्यांनी ‘शास्ती’ करावी, अशी अपेक्षा आहे. 

 

Tags : solapur, solapur news, municipal corporation,drainage  safety van, mohol, misuse of  municipal corporation property,