Thu, May 23, 2019 04:17होमपेज › Solapur › मनपा परिवहन बसची धूम-2 सुरू

मनपा परिवहन बसची धूम-2 सुरू

Published On: Aug 30 2018 1:32AM | Last Updated: Aug 29 2018 11:45PMसोलापूर : प्रतिनिधी 

सोलापूर महानगरपालिकेची लयाला गेलेल्या अवस्थेला सहा वर्षांपूर्वी राजेंद्र मदने यांच्या हाती गेल्यावर तब्बल शंभरपेक्षा अधिक बस रस्त्यावर धूम धावायला लागल्या होत्या. मात्र मदने यांच्या बदलीनंतर परिवहनला पुन्हा उतरती कळा आली. मात्र अशोक मल्लाव यांच्याकडे  पुन्हा परिवहन व्यवस्थापकपद आल्यानंतर परिवहनची धूम-2 सिरीजच्या ट्रेलरला सुरुवात झाली आहे.

मल्लाव यांनी व्यवस्थापकपद स्वीकारल्यानंतर दीड महिन्यात 27 वरून चाळीस गाड्या रस्त्यावर धावायला सुरुवात झाली, तर आज महापालिकेने आणखी 40 लाख रुपये दिले असल्याने पुढच्या आठवड्यात आणखी 20 अशा 60 गाड्या धावणार आहेत, अशी माहिती उपायुक्त त्र्यंबक ढेंगळे-पाटील यांनी दिली.

केवळ टायर खराब असल्याने डेपोत पडून असलेल्या बसची संख्या पन्नासच्या घरात होती. त्यांचे टायर बदलून त्या रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न गेल्या अनेक वर्षात झाले नाही. मात्र परिवहन व्यवस्थापक अशोक मल्लाव यांनी गेल्या महिनाभरापासून या बसचे टायर्स बदलण्यासाठी आयुक्त डॉ. ढाकणे यांच्याकडे पाठपुरावा केला आणि त्याला गेल्याच आठवड्यात यश आले. आयुक्त डॉ. ढाकणे यांनी वीस लाख रुपयांचा निधी बसच्या दुरुस्तीसाठी दिला. त्यातून 20 गाड्यांचे टायर्स बदलणे आणि गाड्यांची दुरुस्ती करण्याचे काम वेगाने सुरु झाले. त्यामुळे गेल्या आठवड्यात आणखी 20 गाड्या अशा एकूण 40 गाड्या रस्त्यावर धावायला सुरुवात झाली आहे. आज महापालिकेने आणखी 40 लाख रुपये दिले असल्याने आता नादुरुस्त असलेल्या 20 गाड्यांची त्यात भर पडणार आहे.

लांब पल्ल्याच्या गाड्या सुरु करण्याची घोषणा मल्लाव यांनी केली होती. त्यानुसार महिनाभरातच वैरागपर्यंत बससेवा सुरु केली आहे. या मार्गावरील मार्डी, नान्नज यासारख्या मोठ्या गावांमुळे या मार्गावरील बसला मोठा प्रतिसाद मिळतो आहे. त्यामुळे सध्या दोन बस या मार्गावर असून त्या वाढविण्याचा विचार सुरु आहे.

‘संगमेश्‍वर’च्या टुरिझम विभागामुळे हत्तरसंगकुडलला सुरु झाली बस
संगमेश्‍वर महाविद्यालयातील पर्यटनशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम कोर्सच्यावतीने मंगळवारी हत्तरसंग कुडल येथे एकदिवशीय कार्यशाळेचे आयोजन केले होते. हत्तरसंग येथील पर्यटन वाढावे येथील ऐतिहासिक वास्तू आणि शिलालेखांचा प्रसार व्हावा, यााठी टुरिझम विभागाने केलेल्या या कार्यशाळेसाठी शहरातील शंभर विद्यार्थी अभ्यासक सहभागी झाले होते. त्यांच्या सोयीसाठी एक बस हत्तरसंगकुडल येथे सोडावी, अशी मागणी अशोक मल्लाव यांच्याकडे केली होती. पर्यटनाच्यादृष्टीने हत्तरसंग येथील महत्त्व ओळखून अशोक मल्लाव यांनी सोमवारपासून या गावात नियमित बससेवा सुरु केली. त्यामुळे विजापूर रस्त्यावरील पाच गावांच्या नागरिकांची सोय झालीच, शिवाय हत्तरसंगकुडलचे पर्यटन वाढण्याच्या दृष्टीनेही परिवहनची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.