Mon, Mar 25, 2019 09:43होमपेज › Solapur › ‘जीआयएस’ सर्व्हेची  2 पासून फेरपडताळणी

‘जीआयएस’ सर्व्हेची  2 पासून फेरपडताळणी

Published On: Mar 22 2018 10:54PM | Last Updated: Mar 22 2018 10:33PMसोलापूर : वेणुगोपाळ गाडी

शहरातील मिळकतींच्या जीआयएस सर्व्हेसंदर्भातील तक्रारींची शहानिशा करून अचूक माहिती संकलित करण्यासाठी येत्या 2 एप्रिलपासून फेरपडताळणी करण्याची मोहीम मनपा व सायबरटेक कंपनी संयुक्‍तपणे राबविणार आहे. 

दर चार वर्षांनी शहरातील  मिळकतींचे रिव्हिजन मनपाकडून करणे गरजेचे आहे. मात्र गेल्या 12 वर्षांत अपेक्षित तीन रिव्हिजनचे काम झाले नाही. त्यामुळे मनपाचा कोट्यवधींचा महसूल बुडत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मनपा आर्थिक अरिष्टात असून सेवकांचे पगार करणे मुश्किल बनले आहे. मनपाच्या रेकॉर्डनुसार शहरात सुमारे एक लाख, तर हद्दवाढ भागात सव्वा लाख म्हणून एकूण सव्वादोन लाख मिळकती आहेत. शहर-हद्दवाढ भागात मनपाच्या रेकॉर्डवर नसलेल्या हजारो मिळकती आहेत.  रेकार्डवरील मिळकतींचे रिव्हिजन तसेच नव्या मिळकतींचा शोध घेण्याच्या उद्देशाने सन 2014 मध्ये सायबरटेक कंपनीला पाच कोटी 20 लाखांचा मक्ता देण्यात आला होता. हे काम एक वर्षात करण्याचा करार होता. मात्र हे काम संथ गतीने होत असल्याने चार वर्षे होत असूनही हे काम अद्याप पूर्ण झाले नाही. कंपनीचे काम बोगस असल्याचा आरोप झाला. मनपा व कंपनी यांच्यात समन्वय नसल्याचाही मुद्दा यानिमित्ताने समोर आला.

कंपनीने आतापर्यंत एक लाख 95 हजार 287  मिळकतींचा सर्व्हे केल्याचा दावा केला आहे. मिळकतींचे मोजमाप चुकीचे झाल्याच्या तक्रारी आल्या. याबाबत मनपाने नमुना पद्धतीने  पडताळणी केली. यातून नजरेस आलेल्या चुकांबाबत मनपा व कंपनीने एकमेकांकडे बोट दाखविण्याचा प्रकारही घडला. 

या पार्श्‍वभूमीवर मिळकतींचे अचूक मोजमाप करण्याच्यादृष्टीने तसेच नळ अधिकृत की बोगस याबाबतचा वाद मिटविण्यासाठी आता मनपा व कंपनी संयुक्तपणे शहरातील सर्व मिळकतींचा सर्व्हे करणार आहेत.  या मोहिमेमुळे कंपनीने केलेल्या कामाची फेरपडताळणी होण्याबरोबरच चुकांची दुरुस्तीही होणार आहे. कंपनीला उर्वरित मिळकतींचा सर्व्हे करण्याचे कामही लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना आयुक्तांनी याआधीच दिल्या आहेत. 

मार्च एण्डला थकीत मिळकतकर वसूल करण्याची मोहीम संपताच लगेचच दोन दिवसांनी म्हणजे 2 एप्रिलपासून फेरपडताळणीची मोहीम सुरू होणार असून ते पूर्ण होण्यास अनेक महिन्यांच्या अवधी लागणार आहे. हे काम अचूकपणे झाल्यास मनपाच्या महसुलात भरीव वाढ  होईल, यात शंका नाही. 

Tags  : solapur municipal corporation, GIS survey