Tue, May 21, 2019 04:06होमपेज › Solapur › स्थानिक स्वराज्य संस्था दिन ध्वजारोहणाला आयुक्तांची दांडी 

स्थानिक स्वराज्य संस्था दिन ध्वजारोहणाला आयुक्तांची दांडी 

Published On: Sep 02 2018 1:18AM | Last Updated: Sep 01 2018 8:49PMसोलापूर : प्रतिनिधी 

अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था दिनानिमित्ताने महापालिकेत इंद्रभुवन इमारतीसमोर शनिवारी झेेंडा वंदनाचा कार्यक्रम झाला. मात्र, आयुक्तांनी या कार्यक्रमाला दांडी मारली. त्यामुळे काल (गुरुवारी) सभागृहात झालेला पदाधिकारी व प्रशासनातील वाद धूसफुसत असल्याचे स्पष्ट झाले.

ब्रिटिश साम्राज्यात गाव, शहरातील  विकासकामे स्थानिक पातळीवर करता यावीत यासाठी नगरपालिका, महानगरपालिका आदी स्थानिक स्वराज्य संस्थांची निर्मिती झाली. त्याच्या स्थापनेचा दिन अर्थात 31 ऑगस्ट रोजी स्थानिक स्वराज्य संस्था दिन देशभरात साजरा केला जातो. त्यानिमित्ताने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रांगणात झेंडावंदन केले जाते. त्यानुसार शनिवारी महापालिकेत महौपारांच्या हस्ते झेंडा वंदन झाले खरे, मात्र प्रशासकीय प्रमुख असलेले आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे हे शहरामध्ये असतानाही या कार्यक्रमाला आले नाहीत. त्यामुळे महापालिकेत हा चर्चेचा विषय झाला.

विशेष म्हणजे ही बाब महापालिकेच्या जनसंपर्क माहिती अधिकारी कार्यालयाला माहित नव्हती. सायंकाळी पाचच्या सुमारास काही पत्रकार या कार्यक्रमाची माहिती घेण्यासाठी जनसंपर्क अधिकारी कार्यालयात गेले. मात्र, जनसंपर्क अधिकारी कांबळे हे कामानिमित्त विभागीय कार्यालयात गेले होते. तेथील कर्मचार्‍यांना बातमीविषयी विचारल्यावर तो आरोग्य विभागाचा कार्यक्रम होता. त्याबाबत आम्हाला काही माहिती नाही, अशी उत्तरे देत कार्यक्रमाबाबत अनभिज्ञता स्पष्ट केली.

यावेळी  गटनेता आनंद चंदनशिवे, स्थापत्य समिती सभापती गुरुशांत धुत्तरगावकर, महिला बालकल्याण सभापती रामेश्‍वरी बिर्रु, नगरसेवक भारत बडुरवाले, आरोग्याधिकारी डॉ. संतोष नवले, मुख्य लेखापाल धनवे, विभागीय कार्यालय अधीक्षक माने, आयुक्तांचे स्वीय सहायक राहुल कुलकर्णी, अग्निशामक दलाचे अधीक्षक केदार आवटे आदी उपस्थित होते. 

परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करा : महापौर शोभा बनशेट्टी
स्थानिक स्वराज्य संस्था या नागरिकांच्या सोयीसुविधांसाठी तयार करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या दिनानिमित्ताने महापालिकेतील प्रशासन आणि नगरेसवकांनी आपापला परिसर स्वच्छ ठेवण्याचा संकल्प करू. केवळ स्वच्छतेमुळे अनेक समस्यांचे निराकरण होते, असे प्रतिपादन महापौर शोभा बनशेट्टी यांनी केले.