Sat, Mar 23, 2019 01:58होमपेज › Solapur › पाटबंधारे विभागाकडेच मनपाचे ११ कोटी रुपये शिल्लक 

पाटबंधारे विभागाकडेच मनपाचे ११ कोटी रुपये शिल्लक 

Published On: Jan 16 2018 2:17AM | Last Updated: Jan 15 2018 8:54PM

बुकमार्क करा
सोलापूर :  प्रतिनिधी

उजनी धरणातून सोलापूर शहरासाठी पाणी घेण्यापोटी पाटबंधारे विभागाने मनपाला भरावयास सांगितलेल्या सुमारे 53 कोटी रुपयांच्या बिलाबाबत वाद निर्माण झाला आहे. चुकीच्या पद्धतीने हे बिल  लावले  आहे  असे सांगत मनपाने पाटबंधारे विभागाचे म्हणणे अमान्य केले आहे. तथापि, मनपामार्फत ऑगस्ट 17 अखेर 17.40 कोटी रुपये देण्यात आले आहेत. ही बाब विचारात घेता मनपाने 11 कोटी 92 लाख रुपये जादा भरले आहेत. 

मनपा आयुक्तांनी याबाबत जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या पत्रात ही बाब नमूद करण्यात आली आहे. औज, चिंचपूर बंधार्‍यातील पाणी संपल्याने उजनीतून पाणी सोडण्याची मागणी मनपाने केली आहे. यावर पाटबंधारे विभागाकडून थकीत 53 कोटींची पाणीपट्टी भरल्याशिवाय पाणी सोडणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. टाकळी इंटेकमध्ये शहराला आणखी सहा दिवस पाणी पुरेल इतके पाणी शिल्लक आहे. हे पाणी संपल्यावर शहराला पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. 

नुकतेच महापालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी उजनीतून पाणी सोडण्याच्या मागणीबाबत मुंबईवारी केली. 53 कोटींचे बिल चुकीच्या पद्धतीने लावल्याच्या मुद्याकडे त्यांनी शासनाचे लक्ष वेधल्याची माहिती आहे. 

दरम्यान, 6 जानेवारी रोजी आयुक्तांनी जिल्हाधिकार्‍यांना पत्र दिले आहे. त्यात म्हटले आहे की, भीमा पाणीपुरवठा योजनेंतर्गत टाकळी हेडवर्क्स येथील भीमा नदीतून उपसा केलेल्या पाण्याची किंमत दरमहा पाटबंधारे खात्याकडे जमा करण्यात येते. नोव्हेंबर 2015 पर्यंत प्रत्यक्ष उपसा केल्याप्रमाणे मनपाने देयके अदा केली आहेत. डिसेंबर 2015 ते नोव्हेंबर 2017 अखेर  मनपाकडे 5.48 कोटी  देणे बाकी होते. तद्नंतर सन 2004 च्या शासन निर्णयानुसार प्रत्येक  आवर्तनपोटी 6 ते 9 कोटींप्रमाणे देयके देण्यात आली. आजअखेर मनपाकडे 49.66 कोटी इतकी थकबाकी दिसते. तथापि, मनपाने ऑगस्ट 2017 अखेर 17.40 कोटी पाटबंधारे विभागाला अदा केले. 

उजनी धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याबाबत वहन तूट धरण्यात आली आहे तसेच गोविंदपूर व उमराणी या कर्नाटकमधील बंधार्‍यामध्ये सोडण्यात आलेल्या पाण्याचीची रक्कम मनपाला दिलेल्या देयकात गृहित धरण्यात आली आहे. नगरपालिका व शेतीसाठी केलेला पाण्याचा वापरही यामध्ये गृहित धरले आहे. ही बाब 22 डिसेंबर 2017 च्या सुनावणीत मांडण्यात आली आहे. मात्र नोव्हेंबर 17 पूर्वी उपशाप्रमाणे देयक अदा केल्याप्रमाणे मनपाकडून डिसेंबर 15 ते नोव्हेंबर 17 पर्यंत उपशाप्रमाणे एकूण 5.48 कोटी एवढी होते. 

तथापि, मनपामार्फत ऑगस्ट 17 अखेर 17.40 कोटी रुपये देण्यात आले आहे. ही बाब विचारात घेता मनपाने 11 कोटी 92 लाख रुपये जादा भरले आहेत. असे असतानाही जलसंपदा विभागाच्या मागणीनुसार उजनीतून उचललेल्या पाण्याचे 15.00 लक्ष व 19.15 लक्ष असे एकूण 34.95 लाखांचे धनादेश 30 डिसेंबर 17 रोजी जलसंपदा विभागास देण्यात आले आहेत.  वास्तविक जलसंपदा विभागाने केलेली मागणी नियमबाह्य आहे. यावर सुनावणी सुरू आहे, असे या पत्रात म्हटले आहे.मनपाच्या या मुद्यांवर सुनावणीत निर्णय घेण्यात येणार आहे. दरम्यान, या वादात उजनीतून तातडीने पाणी न सोडल्यास शहराला पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची चिन्हे आहेत.