Sun, May 26, 2019 19:09होमपेज › Solapur › सेवानिवृत्तीला परिवहन सेवकास सभापतींच्या गाडीतून सोडले घरी

सेवानिवृत्तीला परिवहन सेवकास सभापतींच्या गाडीतून सोडले घरी

Published On: Dec 04 2017 1:33AM | Last Updated: Dec 03 2017 9:01PM

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

आर्थिक संकट हे पाचवीलाच पूजलेल्या महापालिका परिवहन उपक्रमाला ‘अच्चे दिन’ कधी येणार हे सांगणे अवघड असले तरी या उपक्रमाच्या कर्मचार्‍यांना निवृत्त होतानाच दिवस मात्र सुखद ठरणार आहे. कारण यादिवशी सेवानिवृत्त होणार्‍या कर्मचार्‍यास चक्क परिवहन समिती सभापतींच्या गाडीतून सन्मानपूर्वक घरी सोडण्यात येणार आहे.

परिवहन उपक्रमात वाहक असलेले व्ही. के. चव्हाण व मेकॅनिक असणारे हुसेन पटेल हे 30 नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त झाले. गेली अनेक वर्षे सातत्याने उशिरा होणार्‍या पगारामुळे हालअपेष्टा सहन कराव्या लागणार्‍या या कर्मचार्‍यांना निवृत्तीचा दिवस मात्र सुखद ठरला. याचे कारण म्हणजे यादिवशी त्यांना निरोप दिल्यावर परिवहन सभापतींच्या गाडीतून घरी सोडण्यात आले. सभापती दैदिप्य वडापूरकर यांच्या कल्पनेतून हा उपक्रम राबविण्यास सुरुवात झाली. चक्क सभापतींच्या गाडीतून आदरपूर्वक घरी सोडण्याच्या या अभिनव उपक्रमामुळे हे दोन्ही कर्मचारी भारावून गेले. यापुढे निवृत्त होणार्‍या प्रत्येक परिवहन कर्मचार्‍याला या पद्धतीने निरोप दिला जाणार आहे.

परिवहन कर्मचार्‍यांचा गेल्या सहा महिन्यांचा पगार झाला नाही. आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेल्या या उपक्रमाची अवस्था खूपच दयनीय आहे. वेळेवर पगार होत नसल्याने अनेक विवंचना, यातनांना सामोरे जावे लागण्याची वेळ परिवहन कर्मचार्‍यांवर आली आहे. आर्थिक पेचामुळे उदरनिर्वाह करणे, मुलामुलींचे शिक्षण, विवाह, आजारपण या खर्चांचा ताळमेळ करण्यासाठी या कर्मचार्‍यांना अक्षरश: तारेवरची कसरत करावी लागत आहे. याची दखल घेऊन कसेबसे एका महिन्याचा पगार करण्यात आला, हे खरे असले तरी परिवहन उपक्रमाच्या उर्जितावस्थेसाठी कायमची उपाययोजना करण्याची गरज आहे, अशी अपेक्षा या कर्मचार्‍यांची आहे.