Sun, Aug 25, 2019 20:02होमपेज › Solapur › विरोधकांच्या एकीचे सत्ताधार्‍यांना आव्हान

विरोधकांच्या एकीचे सत्ताधार्‍यांना आव्हान

Published On: Mar 08 2018 11:00PM | Last Updated: Mar 08 2018 9:11PMसोलापूर : वेणुगोपाळ गाडी

महापालिका स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने  सर्व विरोधी पक्ष  एकत्र आल्याने मनपातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. या आव्हानाचा सत्ताधार्‍यांवर मुकाबला करण्याची वेळ आली आहे. 

वर्षभरापूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाले नसतानाही भाजपने सत्ता हस्तगत केली. काही विरोधी पक्षांच्या छुप्या पाठिंब्यामुळे भाजपने सत्ता काबीज करण्यात यश मिळविले खरे, पण नंतरच्या काळात अंतर्गत गटबाजीमुळे  भाजपला पुरते ग्रासले. महापालिका सर्वसाधारण सभांमध्ये काही विषयांवर पालकमंत्री व सहकारमंत्री या दोन गटांची भूमिका भिन्न दिसून आली. या दोन गटांनी एकमेकांवर कुरघोडीचा प्रयत्न केला. त्यामुळे मनपात सत्ताधारी कोण व विरोधक कोण हेच कळेनासे झाले. अशातच प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या शिवसेनेची भूमिका वेगळीच राहिली.  शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, एमआयएम, बसप, माकप या विरोधी पक्षांमध्ये एकवाक्यता नसल्याने या सर्वच पक्षांच्या ‘पॉलिसी’ वेगवेगळ्या होत्या. शिवसेनेची भूमिका सत्ताधार्‍यांना ‘फॉर’ असल्याने उर्वरित विरोधी पक्षांनी वेळोवेळी शिवसेनेवर टीका करण्याची संधी सोडली नाही. विरोधकांमधील दुहीचा फायदा सत्ताधार्‍यांनी अधूनमधून घेतला. एकीकडे सत्ताधार्‍यांमध्ये अंतर्गत गटबाजी, तर दुसरीकडे विरोधी पक्षांची भिन्न भूमिका यामुळे मनपात प्रचंड गोंधळाची स्थिती वर्षभरात दिसून आली. 

या पार्श्‍वभूमीवर स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत मात्र विरोधकांची कमालीची एकी पाहावयास मिळत आहे. मनपाची आर्थिक नाडी समजली जाणार्‍या स्थायी समितीची सत्ता हस्तगत करण्याचा डाव सर्व विरोधी पक्षांनी एकत्रित येऊन आखला आहे. विशेष म्हणजे शिवसेनेला उर्वरित सर्व विरोधी पक्षांचा एकमुखी पाठिंबा मिळाला. सत्ताधार्‍यांमधील दुफळीचा फायदा उठविण्याचा सर्व विरोधी पक्षांचा प्रयत्न आहे. स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत झालेल्या अभूतपूर्व गोंधळानंतर फेरनिवडणुकीला न्यायालयाने स्थगिती दिल्याने भाजपची मोठी नामुष्की झाली 
आहे. एकंदर विरोधकांच्या एकीचे सत्ताधार्‍यांपुढे खडतर आव्हान असून त्यांना यापुढील काळात सावध पवित्रा घ्यावा लागणार आहे. असे न केल्यास सत्तेवर पाणी फेरले जाऊ शकते.