Fri, Apr 26, 2019 19:49होमपेज › Solapur › अबब! मनपा सभेत चक्क दोन सभागृह नेते

अबब! मनपा सभेत चक्क दोन सभागृह नेते

Published On: Feb 13 2018 1:58AM | Last Updated: Feb 12 2018 9:48PM सोलापूर : प्रतिनिधी

महापालिका  सभेत  सत्ताधार्‍यांच्या गटबाजीने सोमवारी कळसच गाठला. सभागृहनेत्याची भूमिका चक्क दोनजणांनी बजाविल्याने सभेचा पोरखेळ झाला. अखेर सभागृहनेत्याचा मान महापौरांनी सहकार नेत्याच्या गटाला दिल्यानंतर खवळलेल्या पालकमंत्री गटाने सभात्याग केला. दरम्यान, सभेत विरोधकांना बोलायला संधी न दिल्याने गोंधळातच सभा उरकण्यात आली.

मनपाची नोव्हेंबरची सभा महापौर शोभा बनशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपमहापौर शशिकला बत्तुल, आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे, नगरसचिव प्रवीण दंतकाळे,  सभागृहनेते सुरेश पाटील हे आजारी असल्याने प्रभारी सभागृहनेतेपदावरुन पालकमंत्री व सहकारमंत्री गटात वाद सुरू आहे. गटबाजीमुळे भाजपची मोठी बदनामी होत असल्याची दखल घेत गत महिन्यात मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन गटबाजीला पूर्णविराम देण्याची तंबी देतानाच प्रभारी सभागृहनेत्याची नियुक्ती दोन्ही गटांनी सामोपचाराने घेण्याची सूचना केली होती. मात्र तब्बल महिना उलटूनही मनपा सभेच्यादृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या या पदाची नियुक्ती अद्याप झाली नाही.

सोमवारी मनपाच्या तहकूब सभेला सुरुवात होताच महापौरांनी कामकाज सुरू करण्याचे आदेश दिले. यावर पालकमंत्री गटाचे श्रीनिवास रिकमल्ले, तर सहकारमंत्री गटाचे नागेश वल्याळ हे दोघे एकाचवेळी उभे राहात सूचना वाचण्यास सुरु केली. यावरुन सारे सभागृह बुचकळ्यात पडले. महापौरांनी रिकमल्ले यांना बसण्यास सांगत वल्याळ यांनी सूचना वाचण्याचे आदेश दिले. त्यानुसार रिकमल्ले हे खाली बसले अन् वल्याळ सूचना वाचू लागले. यानंतर काही मिनिटांतच रिकमल्ले, उपमहापौर बत्तुल यांच्यासह पालकमंत्री गटाच्या एकूण 35 नगरसेवकांनी सभात्याग केला. 

दरम्यान, या गोंधळातच सभेचे कामकाज रेटण्यात आले. सभेत मांडलेल्या विषयावर बोलण्याची संधी महापौरांनी न दिल्याने बसपचे गटनेते आनंद चंदनशिवे यांनी हरकत घेतली. यावरुन भाजपचे नगरसेवक प्रभाकर जामगुंडे यांच्यासमवेत त्यांचा वाद झाला. यानंतर एमआयएम, काँगे्रस, राष्ट्रवादी आदी विरोधी पक्षांनी सदस्यांना बोलू द्या, अशी मागणी करीत गोंधळ घातला. 

या गोंधळातच परिवहन, आरोग्य  खात्याच्या  विषयांवर विरोधकांनी प्रशासनाला धारेवर धरले. काँगे्रसचे ज्येष्ठ नगरसेवक यु.एन. बेरिया, शिवसेनेचे राजकुमार हंचाटे, गुरूशांत धुत्तरगावकर आदींनी या चर्चेत भाग घातला. सभेतील गोंधळ थांबत नसल्याचे लक्षात येताच महापौरांनी सर्व विषय दुरूस्तीसह मंजूर केल्याचे सांगत सभा गुंडाळली.