Fri, Jul 19, 2019 23:12होमपेज › Solapur › महापालिका सभेत महापौरांची मनमानी; विरोधकांची झुंडशाही

महापालिका सभेत महापौरांची मनमानी; विरोधकांची झुंडशाही

Published On: Apr 17 2018 10:33PM | Last Updated: Apr 17 2018 10:24PMसोलापूर : प्रतिनिधी

महापालिका सभेत नेहमीप्रमाणे  गोंधळाची परंपरा मंगळवारीदेखील कायम राहिली. समांतर जलवाहिनीच्या विषयावर विरोधकांनी मतदानाची केलेली मागणी फेटाळून लावत महापौरांनी सभा रेटल्याने सभेत मोठा गदारोळ झाला. याच विषयावरून खवळलेल्या काँग्रेसच्या एका सदस्याने सभागृहातच नगरसचिवांना धक्काबुक्की केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. महापौरांची मनमानी, तर विरोधकांच्या झुंडशाहीचा प्रत्यय यावेळी आला. 

जानेवारी व फेब्रुवारीची तहकूब सभा मंगळवारी महापौर शोभा बनशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.  यावेळी उपमहापौर शशिकला बत्तुल, आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे, नगरसचिव प्रवीण दंतकाळे उपस्थित होते. जानेवारीच्या विषयपत्रिकेवरील 692 कोटींच्या समांतर जलवाहिनी योजनेबाबत निधीची उपलब्धता तसेच आनुषंगिक कार्यवाहीसाठी आयुक्तांना अधिकार देण्याच्या विषयावर सभागृहनेते संजय कोळी यांनी सूचना मांडल्यावर शिवसेनेचे गुरुशांत धुत्तरगावकर यांनी उपसूचना मांडली. या योजनेपेक्षा पूर्वी तयार करण्यात आलेली 1240 कोटींची योजना राबविणे शहराच्या हितावह असल्याचा मुद्दा त्यांनी मांडला. 

टाकळी-सोरेगावदरम्यानदेखील समांतर जलवाहिनी घातल्यास शहराचा पाणीपुरवठा सहा महिन्यांत सुरळीत होऊ शकतो, अशी भूमिका शिवसेनेने मांडली. यानंतर काँग्रेसेचे गटनेते चेतन नरोटे व ज्येष्ठ नगरसेवक यु.एन. बेरिया यांनीदेखील 1240 कोटींच्या योजनेचे समर्थन केले. या विषयाच्या ओघात भाजपचे नगरसेवक प्रभाकर जामगुंडे यांनी हद्दवाढ केल्याने शहर बकाल झाले व याला माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे कारणीभूत असल्याचा आरोप केल्याने काँग्रेसचे नगरसेवक जाम खवळले. यावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू होऊन प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. बसपचे गटनेते आनंद चंदनशिवे यांनी विरोधकांना विश्‍वासात न घेता भाजपचा मनमानी कारभार सुरु असल्याचा आरोप केला. याचदरम्यान शिवसेना व काँग्रेसने उपसूचना एकत्रित करण्याचा निर्णय घेऊन सूचना-उपसूचनेवर मतदान घेण्याची मागणी केली. पण महापौरांनी ही मागणी फेटाळून लावत घाईघाईने हा विषय बहुमताने मंजूर केल्याचे घोषित केले. महापौरांच्या या निर्णयाविरोधात सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येत डायससमोर गोंधळ घातला. लोकशाहीचा हा खून असल्याचा आरोप करीत त्यांनी घोषणाबाजीचा सुरुवात केली. गोंधळ आटोक्यात येत नसल्याचे पाहून महापौरांनी सभा एक तासाकरिता तहूकब करीत असल्याचे जाहीर केले.

सभा तहकूब करुन महापौर निघून गेल्यावर विरोधकांनी आयुक्त तसेच नगरसचिवांना धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. यानंतर आयुक्त सभागृहाबाहेर पडतानाच इकडे काँग्रेसच्या एका नगरसेवकाने नगरसचिव प्रवीण दंतकाळे यांनी जोरदार धक्काबुक्की करुत ओढत डायसवर आणले. हा प्रकार समजताच आयुक्त ढाकणे लगेचच दंतकाळे यांच्या मदतीला  धावून आले. यानंतरदेखील विरोधकांचा सभागृहात गोंधळ सुरुच होता. काँग्रेसच्या नगरसेवकांनी आपल्या टेबलावरील अजेंडा फाडून अस्ताव्यस्त टाकून दिल्या. 

दरम्यान, जलवाहिनी विषयावरुन निर्माण झालेला पेच सोडविण्यासाठी महापौरांनी सर्व गटनेत्यांनी आपल्या दालनात बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी या विषयावर एकमत घडविले. त्यानंतर सभेच्या कामकाजाला पुन्हा सुरूवात झाली.  समांतर जलवाहिनीच्या विषयाबाबत शिवसेनेने उपसूचनेत बदल केेल्यानंतर हा विषय एकमताने मंजूर करण्यात आला. शासनाने 439 कोटींच्या समांतर जलवाहिनी योजनेला  मंजुरी दिल्याने या विषयाला मंजुरी देऊन 1240 कोटींपैकी 439 कोटी वजा जाता उर्वरित रकमेसाठी नवीन प्रस्ताव पुढील सभेत आणण्याचे या सभेत एकमताने ठरले.

काँग्रेसचे सदस्य बेरिया यांनी परिवहन संपाविषयी लक्षवेधी घेतली. यावर लवकरच बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्‍वासन महापौरांनी दिले. माजी सभागृहनेते सुरेश पाटील यांना उपचारासाठी मनपाने 20 लाखांची मदत करण्याच्या प्रस्तावालादेखील एकमताने मंजुरी देण्यात आली. अन्य विषयांवरदेखील कामकाज झाले.